घरमुंबईडोंबिवलीकरांच्या लोकल कळा, स्वत: अमित ठाकरे मैदानात उतरणार!

डोंबिवलीकरांच्या लोकल कळा, स्वत: अमित ठाकरे मैदानात उतरणार!

Subscribe

डोंबिवलीकरांना सहन करावा लागणारा लोकलचा त्रास प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आता अमित ठाकरे स्वत: मैदानात उतरणार आहेत.

कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, तर कधी एक्स्प्रेसचा खोळंबा, तर कधी रूळांवर साचलेलं पाणी! गेल्या अनेक दिवसांपासून घडलेल्या या घटनांमुळे मध्य रेल्वे सेवेचा बोऱ्या वाजला. ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत हे प्रकार घडल्याने, ९० टक्के नोकरदार वर्ग असलेल्या डोंबिवलीकर प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे डोंबिवलीकर प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी खुद्द अमित ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत. मंगळवार ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे अमित ठाकरे राजकारणात एन्ट्री करणार का? अशीही उत्सुकता यानिमित्त निर्माण झाली आहे.

जीव धोक्यात घालून डोंबिवलीकरांचा प्रवास!

ठाण्यानंतर सर्वाधिक गर्दीचे आणि उत्पन्न असणारे स्थानक म्हणून डोंबिवलीकडं पाहिलं जातं. लोकलच्या वेळापत्रकावरच डोंबिवलीकरांचा दिवस उजाडतो आणि मावळतो. त्यामुळे लोकलसेवा ही डोंबिवलीकरांची जीवनवाहिनी म्हणूनच ओळखली जाते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीकरांना लोकलकळा सहन कराव्या लागत आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा कधीच वेळेवर आली नाही. त्यामुळे एकीकडे गर्दीचा सामना करतच जीव धोक्यात घालून डोंबिवलीकरांना प्रवास करावा लागतो. तर दुसरीकडे कामाचा लेट मार्कही सहन करावा लागतो. डोंबिवलीकरांच्या रेल्वे समस्या सोडवण्यासाठी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मनसेने रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेऊन डोंबिवलीकरांचे गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर आता डोंबिवलीकर प्रवाशांच्या समस्यांसाठी अमित ठाकरे हे रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहेत. मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम आणि पालिकेतील गटनेता मंदार हळबे हे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीकरांच्या समस्या मांडणार आहेत. रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे सेवा देणे आणि डोंबिवलीहून महिला विशेष लोकल सुरू करणे या मागण्या यादरम्यान मांडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – म्हणून अमित राज ठाकरेंचे भाषण कार्यकर्त्यांसोबत उभं राहून ऐकतो

तयारी विधानसभेची?

येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे परिवर्तनाचा नारा देत मनसेने विधानसभा निवडणुकीची तयारी केल्याचेही बोलले जाते. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे दोन टर्म आमदार आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच मनसेने ‘राज्यमंत्र्यांचे काम दाखवा, ५०१ रूपये बक्षीस मिळवा’ अशी घोषणा केली होती. आठवड्याभरापूर्वीच राज्यमंत्री चव्हाण यांनी डोंबिवली लोकलला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पेढे वाटप केले होते. रेल्वे सेवा हा डोंबिवलीकरांच्या जिव्हाळयाचा प्रश्न आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळयांसमोर ठेवूनच मनसेने रेल्वे समस्यांना प्राधान्य देत खुद्द अमित ठाकरे यांनाच मैदानात उतरवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -