वन्यजीवांच्या ‘जीवावर’ मुंबईचा विकास!!

वन्यजीवांच्या ‘जीवावर’ मुंबईचा विकास!!

मुंबईतील विकासामुळे वन्यप्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत

अजगर, घोणस, मण्यार यासारख्या प्राण्यांचा वावर मुंबईतील रस्त्यांवर म्हणजे दुर्मिळ चित्र नाही का? पण, मुंबईतील रस्त्यांवर वन्य जीावांचा वाढत्या वावरामगील कारण केव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे? मुंबईचा होणारा विकास हाच या वन्यजीवांच्या ‘जीवावर’ उठलाय असे म्हटले तर वावगे ठरू नये. मुंबईमध्ये सध्या झपाट्याने विकासकामे होत आहेत. टोलंजंग इमारती, मेट्रोसह अनेक कामांनी वेग घेतला आहे. परिणामी, खारफुटी आणि जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मुंबईचा हाच विकास आता वन्य जीवांच्या जीवावर उठला असून त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळेच अजगर, घोणस, मणियार आणि कोब्रा सारखे वन्यजीव आता मानवी वस्तीमध्ये दिसू लागले आहेत.

बीकेसीमध्ये सात महिन्यात सात अजगर

बीकेसी अर्थात वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो मुंबईतील हायप्रोफाईल आणि पॉश परिसर. मात्र या परिसरात देखील आता वन्यजीव रस्त्यावर दिसत आहेत. गेल्या सात महिन्यामध्ये बीकेसी परिसरामध्ये सात अजगर पकडण्यात आले. गुरूवारी मध्यरात्री देखील बीकेसी परिसरात आयकर विभागाच्या कार्यालयाजवळ १८ महिन्यांचा अजगर दिसून आला. रहिवाशांनी वेळीच याची कल्पना मानव अभ्यास केंद्राला दिली. त्यानंतर सर्पमित्र अतुल कांबळे यांच्या साथीदारांनी १८ महिन्यांचा हा अजगर पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला. विशेष म्हणजे नाग, घोणस, पानदिवड, नानेटी जातीच्या जवळपास ५० सापांना आत्तापर्यंत बीकेसी परिसरामध्ये पकडण्यात आले आहे.

मुंबईतील मुलुंड, गोरेगाव, भांडुप, कांजूरमार्ग, पवई, घाटकोपर,कांदिवली, बोरीवली, दहिसर, तसेच बीकेसी भागात धामण,घोणस, साफ, फुरसे, नानेटी आणि अजगर यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. तसेच जेव्हा हिरवळीच्या भागात विकास कामे होत असतात त्यावेळी त्यांचा अधिवास नष्ट होतो. परिणामी हे वन्यजीव रस्त्यावर येतात. कधीकधी हे वन्यजीव मानवीवस्तीत देखील जातात. विशेष म्हणजे सुरूवातीला मानववस्तीत अशा प्रकारे अजगर, साप, घोणस आढळून आले तर रहिवासी घाबरून त्यांना मारायचे. इजा पोहोचवायचे. आता मात्र वन्यजीवांना न मारता प्राणी मित्रांना त्याची कल्पना दिली जाते अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनीस कुंजू यांनी माय महानगरशी बोलताना दिली. महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याला ३० ते ३५ विविध जातीचे वन्यजीव पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे.

 

First Published on: July 12, 2018 7:10 PM
Exit mobile version