CoronaVirus: पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट होणार!

CoronaVirus: पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट होणार!

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या मास्क, पीपीई किटवर विषाणू जमा होत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ पाटील, स्वच्छ ऊर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे आणि त्यांचा विद्यार्थी रोशन राणे यांनी एकत्र येऊन पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारीत अँटीव्हायरल कोटींग्स तयार केली आहेत. विशिष्ट प्रकारच्या पॉलिमर्समध्ये नॅनो पार्टीकल्स बनवून त्याची कोटींग तयार करण्यात आली आहेत.

अवघ्या चार तासात ही कोटींग्स तयार केली जाऊ शकतात 

पीपीई कीट आणि मास्कवर जमा होणारे विषाणू नष्ट करण्यासाठी विशिष्ट पॉलिमर्सची गरज भासते. त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणित पॉलिमर्सचाच यात वापर करणे गरजेचे होते. यात कोटींग्स तयार करण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. ही कोटींग्स अवघ्या चार तासात तयार केली जाऊ शकतात. विद्यापीठाने बनवलेल्या या अँटीव्हायरल कोटींग्सची पीपीई कीट आणि एन-९५ मास्कच्या पॉलिमर्सवर याची प्राथमिक चाचणी करण्यात आली आहे. या कोटींग्सची कोरोना विषाणूंना मारण्याची क्षमता तपासण्यासंदर्भातील चाचण्या घेण्यासाठी ते पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी येथे पाठविण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच शैक्षणिक उपक्रमातील हा एक टप्पा आहे. शैक्षणिक क्षेत्रातून जेवढी भरीव मदत करता येईल त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


हेही वाचा – CoronaVirus: भारतातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची गुणवत्ता कमी – अमेरिकन वैज्ञानिक


 

First Published on: May 6, 2020 6:52 PM
Exit mobile version