कांदा-बटाट्यांचा ओव्हरलोड माल उचलण्यास नकार

कांदा-बटाट्यांचा ओव्हरलोड माल उचलण्यास नकार

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारल्याने कांदा-बटाटा मार्केट बंद आहे. वारंवार पत्रव्यवहार करुनही व्यापारी ५० किलोपेक्षा जास्त माल मागवत असल्याने संतापलेल्या एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. जोपर्यंत ५० किलोपेक्षा कमी माल बाजार आवारात येणार नाही, तोपर्यंत माथाडी कामगार माल खाली करणार नाही, असा पवित्राच माथाडी कामगारांनी घेतला आहे. मंगळवारी जवळपास १५० ट्रक मालाची आवक मार्केटमध्ये झाली. सकाळपासूनच कामबंद केल्याने हजारो टन माल गाड्यांमध्ये असाच पडून राहिल्याने व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे.

नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केट आवारात येणारी कांदा-बटाट्यांची ५० किलोपेक्षा जादा वजनाच्या गोणीतील माल माथाडी कामगार खाली करण्यास नकार देत माथाडी कामगारांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. दुसर्‍या दिवशी मंगळवारी देखील आंदोलन सुरूच होते. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते तथा माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बंदमध्ये माथाडी कामगारांनी एकजुटीने सहभाग घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, विविध कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या शरीर स्वास्थ्याला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, या उद्देशाने ५० किलोपेक्षा जास्त माल गोणीमध्ये भरला जाऊ नये. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने २६ एप्रिल २०११ ला आदेश काढला आहे. त्यानुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केट आवारात कांदा-बटाटा मालाची ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी आणली जाऊ नये, म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून या बाजार आवारातील मालक असोसिएशन व बाजार समितीकडे मागणी करत आहे.

याबाबत अनेक वेळा चर्चा देखील करण्यात आलेली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी, टान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्यावतीने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देखील दिले होते. मात्र, त्यानंतर देखील एपीएमसी मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजन असणार्‍या गोणी बाजारात येत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांनी संप केला आहे.

कांदा-बटाटा मार्केट आवारातील येणार्‍या मालाच्या गोण्या ६० ते ६५ ऐवजी नियमानुसार ५० किलोपर्यंत करण्यात याव्यात. यासाठी संघटना पाठपुरावा करत आहे. श्रमिक कामगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या माथाडीकडे मालक असोसिएशन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे माथाडींनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
– नरेंद्र पाटील, माथाडी नेते

शासनाच्या जीआरनुसार ५० किलो वजनाची गोणी अपेक्षित असताना काही व्यापार्‍यांकडे ६० ते ६५ किलो वजनाचा माल येत आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये या नियमाचे उल्लंघन होत आहे. माथाडींच्या आंदोलनानंतर बाजार समिती प्रभारी सचिव संदीप देशमुख यांनी परिपत्रक काढून ५० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या शेतमाल गोणीच्या वाहनांना बाजार आवारात बंदी केली आहे.

First Published on: November 17, 2021 6:45 AM
Exit mobile version