नववी, दहावीतून कला विषय वगळणार

नववी, दहावीतून कला विषय वगळणार

नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमातून स्व-विकास आणि कलारसास्वाद हे विषय वगळून त्याऐवजी जलसुरक्षा हा विषय सुरू करण्याचे प्रशासनाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. जलसुरक्षा हा विषय यावर्षी नववीसाठी तर पुढच्या वर्षीपासून दहावीसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कलाशिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा कला शिक्षणावर प्रहार करण्याची तयारी चालू आहे. चार वर्षांपूर्वी इयत्ता नववी दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता. त्यावेळी जुना रेखा कला व रंगकाम हा विषय कायमचा हद्दपार करण्यात आला होता. त्याऐवजी कार्यशिक्षण, व्यक्तिमत्व विकास व इतर विषय एकत्रित करून स्व-विकास आणि कलारसास्वाद हा नवीन विषय लागू करण्यात आला.

कलारसस्वादाच्या रुपाने कला विषयाचे अस्तित्व दिसल्याने कलाशिक्षकांनी ती बाब सकारात्मक घेऊन स्वीकार केली. याबाबतीत शिक्षकांना या विषयाचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. परंतु आता नववी दहावीच्या अभ्यासक्रमातून स्व-विकास व कलारसास्वाद हे विषय वगळून त्याऐवजी जलसुरक्षा हा विषय सुरू करण्याचे प्रशासनाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. जलसुरक्षा हा विषय यावर्षी नववीसाठी तर पुढच्या वर्षीपासून दहावीसाठी लागू करण्यात येणार आहे.

नववी-दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा स्थित्यंतराचा काळ असतो. त्यामुळे व्यक्तिमत्व विकास, आनंददायी शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी या वयोगटात कलाशिक्षण अत्यंत महत्वाचे ठरते. परंतु शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थी, कलाशिक्षक व कलाप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच कलाविषय शिक्षणातून रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

कला हा विषय विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप महत्वाचा आहे. कलेविना जीवनशून्य आहे. शिक्षण विभागामार्फत दरवर्षी कला विषयाबाबतीत बदलाचे निर्णय घेतले जातात. खरे पाहता कला हा विषय 10 वीपर्यंत अनिवार्य असावा. कला विषय व कला शिक्षक यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात आम्ही कलाध्यापक संघटनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.
— महेंद्र पवार, कार्याध्यक्ष, पालघर जिल्हा कलाध्यापक संघ.

First Published on: March 6, 2021 5:15 AM
Exit mobile version