अरुण जोशी यांची सलग नवव्यांदा अध्यक्षपदी निवड

अरुण जोशी यांची सलग नवव्यांदा अध्यक्षपदी निवड

अरुण जोशी यांची सलग नवव्यांदा अध्यक्षपदी निवड

हिंदुमहासभेचे ज्येष्ठ नेते तसेच अनेक नामांकित शैक्षणिक संकुलांच्या माध्यमातून ज्ञानप्रचाराचे कार्य सर्वदूर नेणारे अरुण शामराव जोशी यांची सलग नवव्यांदा मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपद स्विकारताना स्वातंत्र्यवीरांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याने आपण कृतज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या विश्वस्त पदाच्या झालेल्या निवडणूकीत डॉ. चिंतामण साठे, श्रीरंग घारपुरे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि हेमंत तांबट यांची निवड झाली आहे. स्मारकाच्या विशेष सभेत हा निर्णय जाहीर झाला असून त्यांचे सदस्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्नेहलता साठे, मुकुंद गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

अरुण जोशी यांचे कार्य

गेल्या आठ वर्षांत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुण जोशी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशात असलेल्या बातल जवळच्या हिमशिखराला स्वातंत्र्यवीर सावरकर हिमशिखर असे नाव देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अंदमानच्या पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकर असे नाव असून त्या ठिकाणी त्यांचा पुतळा नसल्याचे निदर्शनास येताच स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धपुतळ्याची त्या विमानतळावर प्रतिष्ठापना करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित थ्री डी वॉल मॅपिंग तंत्रावरील ध्वनी-प्रकाशाचा `शो’ हा भारतातील एकमेव असावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू गझलांचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावर आधारित `हम ही हमारे वाली हैं’ ही संगीतमय ध्वनीफित निर्माण करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निवडक ग्रंथसंपदा स्मारकाच्या वतीने १२ भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रेलमध्येदेखील रुपांतरित करण्यात आली आहे. `सावरकर श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा देखील नियमित आयोजित केली जाते. त्याशिवाय मुष्टियुद्ध, धनुर्विद्या, नेमबाजी आदींमध्ये स्मारकाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी केली असून अनेक पदके प्राप्त केली आहेत.

पुढील कार्यकाळाची कसा असेल?

यापुढील काळात देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर (जि. नाशिक) येथील वाड्याला दत्तक घेण्याची प्रक्रिया स्मारकाने सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. अरूण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार आणि कृतिशीलता जनमानसात वेगवेगळ्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आणि व्यापकतेने रुजविण्यात येत आहे. त्यातून देशकार्यालादेखील बळकटी मिळत आहे.


हेही वाचा – `स्वातंत्र्यवीर’ लाईट अँड साऊंड शो पुन्हा सुरु

First Published on: October 30, 2018 4:36 PM
Exit mobile version