सेनेचे अरविंद सावंत, रवींद्र वायकर यांच्या समन्वय पदाच्या नियुक्त्या रद्द

सेनेचे अरविंद सावंत, रवींद्र वायकर यांच्या समन्वय पदाच्या नियुक्त्या रद्द

रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती करण्यात आल्यानंतर दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अरविंद सावंत यांची राज्याच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर निवड केली होती.

तसेच मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज झालेल्या रवींद्र वायकरांना मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक पदावर घेतले होते. अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर या दोन्ही नेत्यांची नियुक्ती राज्य शासनाने परिपत्रक काढून केली होती. त्यात या नेत्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याने त्यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते, सुविधा याबाबत वादंग निर्माण होऊ शकतं असे वर्तविण्यात येत होते. तसेच ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमानुसार भाजपाने या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी देखील केली होती.अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आले होते. मात्र ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार विरोधी पक्ष भाजपाने सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली होती. मात्र भाजपाकडून पुढची कार्यवाही होण्यापूर्वीच अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

First Published on: February 26, 2020 5:42 AM
Exit mobile version