उशीर भोवला! पुन्हा एक रात्र तुरुंगात

उशीर भोवला! पुन्हा एक रात्र तुरुंगात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असला तरी शुक्रवारी त्याची आर्थर रोड तुरुंगातून सुटका होऊ शकली नाही. जामीन दिल्याची कोर्टाची कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणे अपेक्षित होते; पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी आर्यनची सुटका झाली नाही. आर्यनला शुक्रवारची रात्रदेखील जेलमध्येच काढावी लागली.

आर्यन खान आज ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडणार नाही. कुणासाठीही नियम बदलणार नाही. जामिनासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रपेटी आम्ही उघडलेली होती. पण तिथे आर्यनच्या जामीनासंबंधित कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आर्यनची शुक्रवारी जेलमधून सुटका होणार नाही, अशी माहिती ऑर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच आर्यनची शनिवारी सकाळी सुटका होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

आर्यनला गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी तुरुंगातून त्याची सुटका व्हावी म्हणून अभिनेत्री जुही चावला आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सेशन कोर्टात दाखल झाल्या. त्यांनी आर्यन खानच्या जामिनावर गॅरेंटर म्हणून सही केली. यावेळी कोर्टात सतीश मानेशिंदे देखील दाखल झाले होते. कोर्टात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली; पण जेलमधून सुटका होण्याबाबतचे देखील काही महत्वाचे नियम असतात. आर्यनच्या जामिनाची सर्व कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या पेटीपत्रात पोहोचणे आवश्यक होते. कारण ही पेटी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उघडते. वकील सतीश मानेशिंदे कोर्टातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करून कागदपत्रे घेऊन कोर्टातून जेलच्या दिशेला निघाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता.

First Published on: October 30, 2021 5:07 AM
Exit mobile version