धक्कादायक! रुग्णवाहिकेच्या अभावी गरोदर महिलेचा रेल्वे रुळावरून पायी प्रवास

धक्कादायक! रुग्णवाहिकेच्या अभावी गरोदर महिलेचा रेल्वे रुळावरून पायी प्रवास

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर गरजू रुग्णांना रुग्णवाहिका न मिळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये सबा शेख या गरोदर महिलेचाही समावेश झाला आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या सबा हिने रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे कळवा ते कल्याण असा पाच तासांचा प्रवास रेल्वे रुळावरून पायी चालत केला आहे. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगाही होता. अखेर इतके कष्ट घेतल्यानंतर केडीएमसीतील खासगी रुग्णालयात तिची प्रसुती झाली. मात्र हॉस्पिटलने रुग्णवाहिका नाकारल्यामुळे या महिलेला अशा अवस्थेत पायी प्रवास करावा लागल्याने या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारल्याने एका गरोदर महिलेचा रिक्षातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तर नवी मुंबईतील एका कुटुंबाला रात्रभर आपल्या मृत आईच्या सोबत रहावे आल्याचेही प्रकरण नुकतेच समोर आले होते. या सर्व घटना वेळेत रुग्णवाहिका ना मिळाल्याने किंबहुना रुग्णांना ते नाकारल्यामुळे घडल्या असल्याचे साधर्म्य आहे.

हेही वाचा – अनलॉक १.० चा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स १०५० अंकांनी वधारला

काय आहे प्रकरण 

कल्याणच्या कचोरे परिसरात राहणाऱ्या आठ महिन्याची गर्भवती सबा शेख ही मे महिन्याच्या सुरुवातीला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली होती. मात्र तिथून तिला रुग्णवाहिकेने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे गेल्यानंतर तिला बाळाचे वजन कमी असून पूर्ण दिवस भरले नसल्याचे सांगून परत जाण्यास सांगितले. मात्र परत कल्याणला जाण्यासाठी कुठलीही वाहनाची व्यवस्था नसल्याने या महिलेने रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. त्यावर रुग्णवाहिका नसल्याचे तिला सांगण्यात आले. अखेर हताश सबाने सोबत ३ वर्षाच्या मुलाला घेऊन कळवा ते कल्याण पाच तास चालत रेल्वे रुळावरून प्रवास केला.

दरम्यान, याबाबत केडीएमसीच्या आयुक्तांना माहिती मिळाल्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ या महिलेला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिची प्रसूती झाली असून तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. नुकतेच मुंब्रा परिसरात ३ हॉस्पिटल्सने नाकारलेल्या २२ वर्षिय गरोदर महिलेचा हॉस्पिटलच्या शोधात असताना रिक्षातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार आणि रुग्णवाहिका न देण्याचे धोरण आता लोकांच्या जीवावर बेतू लागले आहे, असेच म्हणावे लागेल.

First Published on: June 1, 2020 2:35 PM
Exit mobile version