आशा स्वयंसेविकांचा ‘पोलिओ लसीकरण मोहिमे’वर बहिष्कार!

आशा स्वयंसेविकांचा ‘पोलिओ लसीकरण मोहिमे’वर बहिष्कार!

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आशा स्वयंसेविकांचे आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे. रविवारी होणाऱ्या ‘पोलिओ लसीकरण मोहिमे’वरही स्वयंसेविकांनी बहिष्कार टाकल्याने हे काम आता अंगणवाडी सेविकांच्या माथी थोपवले जात आहे. या कामास नकार देणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि संघटनेच्या वादात लहानग्यांचे आरोग्य मात्र वेठीला धरले जात आहे.

अंगणवाडी सेविकांचाही नकार

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण, भिंवडी, अंबरनाथ या चार तालुक्यातील व ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिंवडी, मिराभाईंदर अशा सहा महानगरपालिका क्षेत्रामध्ये १५ सप्टेंबर रोजी, ‘पोलिओ लसीकरण मोहिमे’त काम न करण्याच्या निर्णयावर आशा स्वयंसेविका ठाम आहेत. त्यामुळे आता ह्या लसीकरण मोहिमेचे काम प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना करण्यास सांगितले आहे. मात्र अंगणवाडी सेविकांनीही ह्या लसीकरण मोहिमेत काम करण्यास नकार दिल्यामुळे प्रशासन त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – मी निवडणूक लढवणार नाही – इंदुरीकर महाराज

मोहिम राबविण्यासाठी प्रशासनाचा दबाव

आशा आणि गटप्रवर्तक आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ३ सप्टेंबर पासून संपावर आहेत. जोपर्यंत शासन निर्णय देत नाही तोपर्यंत बेमुदत संप कायम राहणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या लसीकरण मोहिमेचे काम अंगणवाडी सेविकांच्या माथी थोपविण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. मात्र त्यास सेविका नकार देत असल्यामुळे काहींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी यावर बोलणे टाळले तर आरोग्य अधिकारी मनीष रेंघे यांचा संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा – राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे पदाधिकारी सैरभर, नव्या पक्षाच्या शोधात

प्रशासन, संघटनेच्या वादात मुलांचे आरोग्य वेठीला

आशांनी टाकलेला कामावरील बहिष्कार आणि अंगणवाडी सेविकांनी लसीकरण मोहिमेला केलेला विरोध यामुळे ही मोहिम कशी पार पडणार? आणि आरोग्य विभाग काय पर्यायी व्यवस्था उभी करणार? याबाबत साशंकता निर्माण होत आहे. प्रशासन आणि संघटनेच्या या वादात मात्र लहान मुलांचे आरोग्य वेठीस धरले जात आहे.

First Published on: September 14, 2019 8:22 PM
Exit mobile version