मुंबईच्या बजेटवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कंत्राटदारांचे नव्हे तर…”

मुंबईच्या बजेटवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कंत्राटदारांचे नव्हे तर…”

मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 2023 आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला. यंदा मुंबई महापालिकेने विक्रमी ५२ हजार कोटीचं बजेट सादर केलं. मुंबई मनपाच्या बजेटने पहिल्यांदाच ५० हजार कोटींचा आकडा पार केला. महत्त्वाचं म्हणजे, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. यावर आता मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

“गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट असं जे चित्र होतं ते आज अखेर बदललं आहे.  मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या मागण्या, अपेक्षा मागवून त्यानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसुन मुंबईकरांचे आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

मुंबईतील वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच अर्थसंकल्पात दीड हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वायु प्रदुषण कमी करण्यासाठी वायु प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणण्यात आली आहे. यावर बोलताना आशिष शेलार पुढे म्हणाले की, “मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेले आहे त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल १५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली”, असं म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय.

मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथ देणे ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन 9 मिटर पेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली, असं देखील आशिष शेलार म्हणाले. “नवे संकल्प केलेले नाहीत. त्यामुळे काही अपेक्षा आमच्या आणखीन होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, मलजल नित्सारण,अशा पायाभूत सेवा सुविधांना केलेली तरतूद ही जमेची बाजू आहे.” असं देखील शेलार म्हणाले.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे कंत्राटदारांच्या मर्जीतला हा अर्थसंकल्प नसून मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प आहे, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय.

First Published on: February 4, 2023 1:55 PM
Exit mobile version