मोदींचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी मतदार राहुल गांधींना धडा शिकवतील; भाजपाचा इशारा

मोदींचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी मतदार राहुल गांधींना धडा शिकवतील; भाजपाचा इशारा

मुंबई : सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी आणि अवमानकारक उल्लेख करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची संस्कृती दाखवून दिली आहे. त्यांनी केवळ नरेंद्र मोदी यांचा नव्हे, तर देशाच्या सर्वोच्च सांविधानिक पदावरील व्यक्तीचा अपमान केला असून पराभवाच्या भीतीने वैफल्य आल्यामुळे त्यांचा जिभेवरील ताबा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अशा असभ्य आणि उर्मट नेत्यांना तसेच त्यांच्या पक्षाला जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज दिला.(Lok Sabha Election 2024 Voters will teach Rahul Gandhi a lesson for making derogatory references to Modi BJP)

सोलापूरच्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा सातत्याने एकेरी उल्लेख केला. त्यांचे हे वक्तव्य आणि वर्तन राजकीय संस्कृतीला शोभणारे नसून केवळ वैफल्य तसेच अपरिपक्वपणा दर्शविणारे आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला प्रचंड जनाधार मिळत असून 400 पेक्षा अधिक जागांवरील भाजपा आघाडीचा विजय निश्चित झाल्याने काँग्रेस आणि इंडी आघाडीला वैफल्य आले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणात याआधीही सुसंस्कृतपणा आणि अभ्यासाचा अभावच होता. आता तर त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, उमेदवारही नाहीत आणि निवडणूक लढविण्याची उमेदही राहिलेली नाही. त्यातच, पंतप्रधान न मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा पंचनामा करून जनतेची संपत्ती हिरावून घेण्याचा कट उघड केल्यामुळे काँग्रेसची भंबेरी उडाली आहे. जनतेकडील संपत्ती काढून घेण्याचा काँग्रेसचा इरादा त्यांच्या जाहीरनाम्यातूनच उघड झाला असून पंतप्रधान मोदी यांनीच काँग्रेसचा खारा चेहरा जनतेसमोर आणल्याने आता राहुल गांधी यांची पंचाईत झाली आहे, अशी टीकाही उपाध्ये यांनी केली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कुऱ्हाडीने EVM फोडल्याप्रकरणी तरुणाला अटक; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

काँग्रेस आणि इंडी आघाडीकडे मुद्दे नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर भूमिका नाही आणि भाजपा आघाडी सरकारच्या कामाशी बरोबरीदेखील करता येत नसल्याने अशी वेळ येते तेव्हा काँग्रेसचे नेते आपल्याला शिव्याशाप देतात, असे पंतप्रधान मोदी यांनी वारंवार म्हटले होते. राहुल गांधी यांनी सोलापूरच्या सभेत पंतप्रधानांविषयी असभ्य आणि बेताल एकेरी वक्तव्य करून मोदी यांचा तो दावा खरा करून दाखविला आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसजन शिव्याशाप देतात, तेव्हा पंतप्रधान अधिक जोमाने देशाच्या सेवेसाठी सज्ज होतात, हा गेल्या दहा वर्षांचा देशाचा अनुभव आहे. त्यामुळे राहुल गांधीच्या बेताल वक्तव्यानंतर आता उरलीसुरली काँग्रेसदेखील संपणार असून देशाच्या संविधानिक नेत्याविषयी अनादराने अपमानजनक भाषा वापरणाऱ्या नेत्याला जनताच त्याची जागा दाखवून देईल, असा विश्वासही उपाध्ये यांनी व्यक्त केला.

निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने राहुल गांधी यांच्या पायाखालची वाळू घसरली होतीच, पण आता जीभही घसरत चालली असून काँग्रेसमुक्त भारताच्या संकल्पास ते स्वतःच हातभार लावत आहेत, अशी खोचक टिप्पणीही उपाध्ये यांनी केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राहुल गांधींची पंतप्रधानांविषयीची असभ्य भाषा मान्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा – Maharashtra politics : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीबद्दल रोहित पवार म्हणतात, सत्ता आल्यावर…

Edited By – Rohit Patil

First Published on: April 26, 2024 8:43 PM
Exit mobile version