भाजपकडे वॉशिंग नाही, तर खास डॅशिंग रसायन

भाजपकडे वॉशिंग नाही, तर खास डॅशिंग रसायन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. सर्वाधिक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसह स्थानिक पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हा मुद्दा पकडत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टिप्पणी करताना ‘भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट लोक तिकडे गेल्यावर स्वच्छ होतात?’, असा प्रश्न विचारला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. भुसावळ इथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच ‘भाजपमधील मेगा भरतीची काळजी करण्या-ऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगा गळतीची चिंता करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी विरोधी पक्षांना दिला.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येत आहेत. विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही’, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. राजकारणात माझी बांधिलकी कायम माझ्या मतदारसंघाशी राहिली आहे. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर पेन जबाबदार कसा असू शकतो?, असे विचारत मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांना प्रत्युत्तर दिले. लोकसभेच्या आधी विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत होते. परंतु, त्याचा काही उपयोग होणार नाही, हे आता जयराम रमेश, अभिषेक मनु सिंघवी यांना कळून चुकले आहे. ही गोष्ट लवकरच राज्यातील नेत्यांनाही कळेल, असेही फडणवीस म्हणाले.

First Published on: August 25, 2019 5:33 AM
Exit mobile version