हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएस पथकाकडून घटनेची पुनरावृत्ती

हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएस पथकाकडून घटनेची पुनरावृत्ती

मनसुख हिरेन

प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटके आणि स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस पथकाकडे देण्यात आला आहे. हिरेन यांच्या आत्महत्येची पुनरावृत्ती एटीएसच्या पथकाने केली. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी एटीएस पथकाने घटनेची पुनरावृत्ती केली आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचा तपास एटीएस पथक करत आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर खाडीत सापडला होता. हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचे पत्नी विमला हिरेन यांनी म्हटले आहे.

घटनेची पुनरावृत्ती करण्यासाठी एटीएस पथकाने मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्याच्या ठिकाणी गुरुवारी रात्री उशीरा घटनेचे नाट्यरुपांतर केले. रात्री उशिरा एटीएस आणि फॉरेन्सिक अधिकाऱ्यांची टीम रेतीबंदर परिसरात पोहोचली होती. मनसुख हिरेन यांच्याइतक्याच वजनाचा पुतळा यासाठी वापरण्यात आला आहे. ४ आणि ५ मार्च रोजी जशी समुद्राची स्थिती होती तशीच रात्री असल्याने एटीएस पथकाने गुन्ह्याचं नाट्यरुपांतर केले आहे. यासाठी एटीएसच्या पथकाने स्थानिक मच्छिमांरांची मदत घेतली आहे.

स्थानिक मच्छिमारांना खाडीतील पाण्याचा अंदाज असल्याने त्यांची मदत घेण्यात आली. घटनेचे नाट्यरुपांतर करताना घटनास्थळी एटीएसचे अधिकारी आणि न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे अधिकारीही उपस्थित होते. तसेच यासाठी भरती आणि ओहोटी सांगणाऱ्या तज्ज्ञांचीही मदत एटीएस पथकाने घेतली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह फेकणाऱ्याला भरती आणि ओहोटीची चांगलीच माहिती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु मृतदेह फेकला तेव्हा खाडीमध्ये ओहोटी असल्यामुळे मृतदेह वाहून न जाता किनाऱ्याला लागून गाळात अडकला.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या भागात सापडला त्या जागी कांदळवने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मृतदेह वाहून गेला नसता असे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला तेव्हा भरती आणि ओहोटी होती तशीच ओहोटी शुक्रवारी मध्यरात्री असल्याने नाट्यरुपांतर केले असल्याचे एटीएसच्या पथकाने म्हटले आहे.

 

First Published on: March 12, 2021 10:48 AM
Exit mobile version