Attempt to Suicide : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

Attempt to Suicide : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईः वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने फिनेल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपर पोलीस ठाण्यात घडली. बाळकृष्ण नाणेकर असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यात बदली झाल्याने कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था, मुलांची शाळा आणि अन्य गोष्टींचा विचार करुन ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. याबाबत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र त्यांच्याकडून त्यांना कार्यमुक्त केले जात नव्हते.त्यातून त्यांच्यात वाद सुरु होता. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ते संजय डहाके यांच्या केबीनमध्ये गेले आणि त्यांनी तातडीने कार्यमुक्त करा अशी विनंती केली होती. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यातून नैराश्यातून त्यांनी पोलीस अधिकारी कक्षेत फिनेल प्राशन केले होते.

हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी बाळकृष्ण यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते. पोलीस ठाण्यातच एका पोलीस अधिकार्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईक रुग्णालयात उपस्थित आहेत. या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर दोषी वरिष्ठांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः राज्यातील उपायुक्त-सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

कार्यमुक्ती रखडली होती

घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात बाळकृष्ण नाणेकर यांनी त्यांच्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केल्याचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. बाळकृष्ण नाणेकर हे सध्या घाटकोपर पोलीस ठाण्यातील सायबर सेल विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. डिसेंबर २०२२ साली त्यांची मुंबईतून पुण्यात बदली झाली होती. बदलीनंतर त्यांना तातडीने पुण्यात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र त्यांना कार्यमुक्त करण्यात येत नव्हते.

First Published on: May 30, 2023 11:17 PM
Exit mobile version