…याला जबाबदार तुम्हीच, अतुल भातखळकर यांचा ठाकरेंवर ठपका

…याला जबाबदार तुम्हीच, अतुल भातखळकर यांचा ठाकरेंवर ठपका

भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी शिवसेना पक्षावर भाष्य केले आहे. त्यांनी यावेळी ट्विटमध्ये शिवसेना पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी  शिवसेनाप्रमुखांच्या काळात प्रचंड दबदबा असलेल्या पक्षाची झालेली वाताहत निश्चितपणे आनंददायी नाही. पण उध्दवजी याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात…, असे म्हटले आहे.

 काय म्हणाले होते उद्धव ठाकरे –

मी नव्याने सुरुवात करतोय. माझा सर्वसामान्य शिवसैनिक हेच माझे बळ आहे. हीच माझी दौलत आहे. मी १९ जून १९६६ च्या मानसिकतेचा आहे, तुम्ही तयार आहात का? तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हते, त्या मानसिकतेतून आपल्याला लढायचे आहे. तुम्हाला बघून मला हत्तीपेक्षा हजारो वाघांचे बळ आले आहे. जे गेले ते गेले. ते आपल्या सोबत कधीच नव्हते. हेच दिसते. आता खचायचे नाही. मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही या राजकारणाकडे लक्ष देऊ नका, त्याला तोंड द्यायला मी सज्ज आहे. तुम्ही निवडणुकांकडे लक्ष ठेवा. या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. तुम्हाला या गद्दारांच्या विरोधातील रागाचा निखारा फुलवायचा आहे. बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने संख्याबळाच्या जोरावर विधिमंडळातील गटनेतेपद आणि प्रतोदपद शिवसेनेकडून हिरावून घेतले आहे. पुढची लढाई ही विधिमंडळाबाहेरची असणार आहे. शिंदे गट शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरही दावा ठोकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तशी वेळ आलीच तर पक्षासाठी नव्याने सुरुवात करण्याची तयारीही ठेवल्याचे दिसत आहे. याचा आधार घेऊन अतुल भातखळकर  यांनी हे ट्विट केले आहे.

काय आहे प्रकरण –

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने त्यांच्या गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी नव्या विधानसभाध्यक्षांची नेमणूक करीत शिवसेनेला जोरदार शह दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिवसेनेतून फुटलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे गट प्रयत्न  करत आहे. शिवसेना सुद्धा त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न करत आहे.

First Published on: July 8, 2022 11:24 AM
Exit mobile version