सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वयंचलित पध्दतीने सॅनिटाझेशन`

सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वयंचलित पध्दतीने सॅनिटाझेशन`

करोनाच्या विषाणुचा संसर्ग सर्वाधिक झोपडपट्टी परिसर आणि त्यातील सामुहिक व सार्वजनिक वापराच्या शौचालयांमध्ये अधिक होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच झोपडपट्ट्यांमधील शौचालयांमध्ये दिवसांतून कमीत कमी दोन ते सहा वेळा सॅनिटायझेन केले जात आहे. यावर पर्याय म्हणून स्वयंचलित पध्दतीने सॅनिटायझेन करण्याच्या प्रणालीचा अवलंब केला जात आहे. वरळीतील सामुहिक शौचालयांमध्ये याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता वरळीतील सर्व सामुहिक शौचालयांमध्ये याचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होईल, शिवाय त्यांना बाधा होण्याचाही धोका कमी होईल.

मुंबईतील अनेक झोपडपट्या तसेच चाळींमधील सामुहिक शौचालयांमधून करोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असल्याने सुरुवातीला स्थानिक नगरसेवकांनी सॅनिटायझेन करण्यावर भर दिला होता. त्यानंतर, महापालिकेने स्वयंसेवी संस्थांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून दिवसातून पाच ते सहा वेळा सॅनिटाझेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही भागांमध्ये दिवसांतून सहा वेळा सामुहिक तसेच सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जाते. मात्र, वरळीत सर्वात प्रथम ३० दिवस टिकणार्‍या झोनो या रासायनिक द्रव्याद्वारे सॅनिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर याचा वापर धारावीतील झोपडट्टीत करण्यात आला होता. परंतु आता महापालिकेने यापेक्षा अत्याधुनिक पध्दतीने सॅनिटायझेशन करण्याची पध्दती शोधून काढली आहे.

स्वयंचलित पध्दतीने दर अर्ध्या तासाला सॅनिटायझेशन करण्याच्या या प्रणालीचा वापर वरळी कोळीवाडा येथील सामुहिक शौचालयामध्ये करण्यात आला. कंट्रोल पॅनेलच्या माध्यमातून दर अर्ध्या तासांनी स्वयंचलित पध्दतीने शौचालयांमध्ये सॅनिटायझेशन प्रणालीचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर आता वरळीतील इतर सार्वजनिक शौचालयांमध्ये याचा वापर केला जाणार असल्याचे जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी स्पष्ट केले.

मुंबईत झोपडपट्टयांमधील सार्वजनिक तसेच सामुहिक शौचालयांच्या सॅनिटायझेनचे मोठे आव्हान असून या यशस्वी प्रयोगामुळे मुंबईतील सर्वच सामुहिक शौचालयांमध्ये याचा वापर केल्यास यावर होणारा अनाठायी खर्च, मनुष्यबळ तसेच त्यांना बाधा होणारा धोका कमी होईल, त्यामुळे प्रशासन याबाबतची कार्यवाही कशा पध्दतीने करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

First Published on: June 1, 2020 4:01 AM
Exit mobile version