CoronaVirus: धारावीतील बलिगा नगर, मुकुंद नगर आणि वैभव इमारत सील

CoronaVirus: धारावीतील बलिगा नगर, मुकुंद नगर आणि वैभव इमारत सील

CoronaVirus: धारावीतील बलिगा नगर, मुकुंद नगर आणि वैभव इमारत सील

धारावी परिसरात आतापर्यंत चार कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून येथील बलिगा नगर, मुकुंद नगर आणि वैभव सोसायटीचा परिसर आता करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. या तिन्ही क्षेत्रांना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे यासर्व इमारतीतील रहिवाशांची विशेष काळजी महापालिकेच्यावतीने घेण्यात येत आहे. महापालिकेचा मुख्य फोकस हा तिन्ही इमारतींचा परिसर असून येथील लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून भाजीपाल्यासह औषधे इमारतीतील रहिवाशांना महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

इमारती सील करून आरोग्य शिबिर आयोजित

धारावीतील बलिगा नगर येथील एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अगदी जवळच्या संपर्कात असलेल्या पत्नी, मुली आणि मुलगा यांची चाचणी करण्यात आली. हे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बलिगा नगर येथीलच दुसऱ्या इमारतीत ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याठिकाणच्या इमारती सील करून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला. त्यामुळे महापालिकेने बलिगा नगरवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खाद्यपदार्थांची पाकिटे, किराणा सामान आणि औषधे येथील लोकांना पुरवली जात असल्याचे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

तिन्ही ठिकाणी जंतूनाशकाची फवारणी करून परिसरात निजर्तुंकीकरण

तर धारावीतील मुकुंदनगर येथील ४८ वर्षाच्या इसमाचे कोरोनाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर अत्यंत निकट संपर्कात आलेल्या रुग्णांना येथीलच राजीव गांधी क्रीडा संकुलात हलवण्यात आले आहे. तेथील रहिवाशांनाही महापालिकेच्यावतीने जेवण आणि इतर सुविधा पुरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर वैभव इमारतीत ३५ वर्षी व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असून वैभव इमारतीसह सर्वच इमारतींना सील करण्यात आले आहे. या इमारतीतील रहिवाशांना मागणीनुसार किराणा सामान, औषधे तसेच इतर सुविधा उपलब्ध करून  देण्यात आल्या आहेत. तसेच या तिन्ही ठिकाणी जंतूनाशकाची फवारणी करून परिसरात निजर्तुंकीकरण करण्यात आले आहे.

धारावीत आतापर्यंत आढळून आलेले रुग्ण : ४ पॉझिटिव्ह, एक मृत

बलिगा नगर २ (१ मृत आणि एक पॉझिटिव्ह)

वैभव इमारत (१ रुग्ण पॉझिटिव्ह)

मुकुंद नगर झोपडपट्टी (एक पॉझिटिव्ह)

First Published on: April 4, 2020 10:40 PM
Exit mobile version