व्यसनमुक्त होऊ, व्यसनमुक्त करू

व्यसनमुक्त होऊ, व्यसनमुक्त करू

Addiction free

मुंबईसह देशभरात वाढत असलेली व्यसनाधीनता कमी करण्यासाठी आता तरुण पुढे सरसावले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणार्‍या तरुणांनी हा नवसंकल्प केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन व्यसनाधिनतेविरोधातील या नव्या लढाईची सुरुवात सुखदेव नारायणकर यांच्यासह अनेकांनी केली असून यासाठी ते दादर येथील चैत्यभूमीत दाखल झाले आहेत. आपल्यासारख्याच अनेक तरुणांना व्यसनाधिनतेून बाहेर काढण्यासाठी सातत्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून दादर येथील चैत्यभूमी येथे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. यावेळी बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करण्याचा संकल्प केला जातो. त्याला जोड देऊन आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कित्येक तरुणांनी मानसिक, शारिरीक आरोग्याला घातक असलेली व्यसने सोडण्याचा निर्धार केला आहे. बुद्ध धम्मातील पंचशील तत्वामध्येही अनुयायांना अंमली पदार्थांपासून अलिप्त राहाण्याचे एक वचन घेतले जाते. हा निर्धार या नियमाला पूरक असाच असल्याचे अनुयायांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता, अन्याय आणि असमानते विरुद्ध निरंतर लढा देऊन भारतातील उपेक्षितांना नागरी हक्क मिळवून दिले. भारतात लोकशाही नांदावी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या विचारला पुढे घेऊन जाण्यासाठी आधी व्यसनात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार असल्याचे दैनिक आपलं महानगरशी बोलताना सुखदेव नारायणकर म्हणाले.

आज कित्यके तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकल्यामुळे उद्धवस्त झाले आहेत. भारतातील ग्रामीण भागात राहणार्‍या गरीब कुटूंबातील नागरिकांना दारु, गुटखा आणि तंबाखूसारख्या पदार्थांचे व्यसन जडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने आयुष्यात कितीही चढउतार, आव्हाने, कठिण प्रसंग आले तरी कधीही व्यसनांना जवळ केले नाही. त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी पुढाकार घेत व्यसनमुक्तीचा लढा सुरू केला आहे. असे चैत्यभूमीवर आलेल्या तरुणांनी सांगितले.

सोशल मीडियावर आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्ये पासून तरुणांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतातील तरुणांना व्यसने सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्य कित्येक तरुणांकडून व्यसने सोडण्याचा निर्धार केला जाणार आहे.

First Published on: December 6, 2018 5:28 AM
Exit mobile version