डॉ. विजय राठोड यांच्या आयुक्तपदी नियुक्तीपूर्वी मुख्यमंत्र्यांचा प्रताप सरनाईक यांना फोन

डॉ. विजय राठोड यांच्या आयुक्तपदी नियुक्तीपूर्वी मुख्यमंत्र्यांचा प्रताप सरनाईक यांना फोन

प्रताप सरनाईक आणि विजय राठोड

आमदार प्रताप सरनाईक यांचा मीरा-भाईंदरचे माजी पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांना असलेला विरोध लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीरा-भाईंदरला नवीन आयुक्त दिल्याचे स्पष्ट झाले आहे. डांगे यांना पालिका आयुक्त पदावरून हटवून त्यांच्या जागी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना स्वतः फोन करून तशी पूर्व कल्पना दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तपदी दोन महिन्यांपूर्वीच चंद्रकांत डांगे यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती. मात्र डांगे यांच्या नियुक्तीला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उघड विरोध केला होता. मात्र त्यानंतरही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व नगर विकास खाते सांभाळणारे एकनाथ शिंदे यांनी डांगे यांची नियुक्ती कायम केली होती.

दोन दिवसांपूर्वी जेव्हा ठाणे जिल्ह्यातील चार महापालिकांचे आयुक्त मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी बदलले. त्यावेळी मात्र मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करत असल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून प्रताप सरनाईक यांना ही माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नवीन आयुक्त देण्यात येत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यामुळे एकीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे ठाणे जिल्ह्यातील पालिका आयुक्तांच्या नियुक्त्या नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे सांगत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांबाबत स्थानिक आमदार म्हणून प्रताप सरनाईक यांना पूर्वकल्पना दिली असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा –

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर! जाणून घ्या रुग्णांची आजची आकडेवारी

First Published on: June 26, 2020 9:30 PM
Exit mobile version