ठाणे शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू

ठाणे शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू

नालेसफाई

लोकसभा निवडणुकांमुळे शहरातील नाले सफाईची कामे उशिराने सुरू झाली असली तरी पावसाळ्यापूर्वी बहुतेक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका क्षेत्रात १३ मोठे नाले असून ३२५ छोटे नाले आहेत. अल्पावधीच नालेसफाईची कामे पूर्ण व्हावीत म्हणून गेली काही वर्षे कामांचे विकेंद्रीकरण केले जाते. यंदाही साठ ठेकेदारांना विविध विभागात कामे वाटून देण्यात आली असून ३१ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यानंतरही किरकोळ कामे करण्यासाठी ७ जूनपर्यंत मुभा देण्यात आली आहे. सध्या सर्वच विभागातील नालेसफाईची कामे प्रगतीप्रथावर असून जवळपास ४० टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. निवडणुकांमुळे यंदा नालेसफाईची कामे उशिराने सुरू झाली. मात्र अतिरिक्त मनुष्यबळ आणि जादा वेळ काम करून ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नाले सफाईची कामे व्यवस्थित होत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी महापालिका अधिकाºयांनी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दैनंदिन कामाचा अहवाल मागवून घेतला जात आहे.

शहराच्या अनेक भागात नाल्याचा उपयोग नागरिक कचराभूमी म्हणून करतात. यंदा शहरातील झोपडपट्टी विभागातही घंटागाडी व्यवस्था व्यवस्थितपणे राबविण्यात आल्याने तुलनेने नाल्यात कचरा जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. स्वच्छ भारत अभियानाचा हा एक सकारात्मक परिणाम असल्याचे निरीक्षण संबंधित विभागातील एका अधिकाऱ्याने नोंदवले.

गाळ त्वरित उचलणार

अनेक ठिकाणी ठेकेदार नाल्यातील गाळ बाहेर काढून तसाच काठावर ठेवतात. काही दिवसांनी ती माती पुन्हा नाल्यात जाऊन केलेल्या सफाई कामावर बोळा फिरतो. यासंदर्भात स्थानिक नागरिक सातत्याने महापालिका प्रशासनाकडे तक्रार करतात. यंदा ठेकेदारांना गाळ त्वरित उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाल्याच्या बाहेर गाळ काढून ठेवलेला आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

रोबोटचा वापर

अडचणीच्या ठिकाणचा गाळ काढणे जेसीबीलाही शक्य होत नाही. त्यासाठी गेल्या वर्षीपासून महापालिका प्रशासन रोबोटचा वापर करते. यंदाही रोबोटचा वापर केला जात आहे.

First Published on: May 20, 2019 8:34 PM
Exit mobile version