संपग्रस्त मुंबईकर बेहाल

संपग्रस्त मुंबईकर बेहाल

BEST STRIKE

मुंबई बुधवारचा दिवसही प्रचंड अडचणीचा ठरला. बेस्ट कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप दिसर्‍या दिवशीही सुरू असल्याने कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. तर दुसर्‍या बाजूला बँकांच्या संपामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. बेस्टच्या संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नसल्यामुळे गुरुवारीही मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मात्र बँकांचे कामकाज गुरुवारी सुरु होणार असल्यामुळे मुंबईकरांना तो एक दिलासा नक्कीच असणार आहे.

मुंबईकर कॅशलेस
मुंबईत बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी बँका बंद होत्या. बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे दुसर्‍या दिवशी ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे आर्थिक व्यवहार या संपामुळे ठप्प झाले होते. ग्राहक सेवा, आयात-निर्यात, परदेशी चलनाची देवघेव, चेक क्लिअरिंग यासारख्या बँकांच्या सर्व व्यवहारावर परिणाम झाला होता. बँका बंद असल्यामुळे ग्राहकांची गर्दी एटीएमकडे होती. मात्र अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे मुंबईकर काहीसे ‘कॅशलेस’ झाले होते.

बेस्ट कर्मचार्‍यांनी संप पुकारून मुंबईकरांना वेठीस धरणार्‍या ३०० बेस्ट कर्मचार्‍यांना प्रशासनाने मेस्मा अंतर्गत नोटीस जाहीर केली आहे. इतकेच नव्हे तर बुधवारी सकाळपासूनच बेस्ट वसाहतीतील २ हजार कर्मचार्‍यांना घरे खाली करण्याची नोटीस बेस्ट प्रशासनाने बजावली आहे. त्यामुळे संतापलेल्या बेस्ट कर्मचार्‍यांकडून कुटूंबासहित वडाळा डेपोवर प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

दुसर्‍या दिवशी बेस्ट कर्मचारी आणि बेस्ट प्रशासनामध्ये झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यामुळे दुसर्‍या दिवशीसुद्धा संप सुरुच आहे. बेस्ट कर्माचार्‍यांच्या संपामुळे बुधवारी अनेक मुंबईकर वेळेत ऑफिसला पोहचू शकले नाहीत. तर शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनादेखील या संपाचा फटका बसला असून त्यांना वेळेत पोहोचता आले नाही. दरम्यान, बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांची चांदी झाली आहे. या संपामुळे बर्‍याच ठिकाणी प्रवाशांची लूट होऊ नये म्हणून टॅक्सी आणि रिक्षा स्टॅण्डवर पोलिसांची गस्त होती. मात्र तरीसुद्धा रिक्षा आणि टॅक्सी पकडण्यासाठी मुंबईकरांच्या रांगाच रांगा दिसून येत होत्या.

मुंबईकरांचे हाल होऊ नये म्हणून संपाच्या दुसर्‍या दिवशीही एसटी महामंडळाकडून ७६ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. बेस्ट कर्मचार्‍याच्या संपामुळे बेस्टला सरासरी ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. हा संप मागे घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही. अशी टोकाची भूमिका बेस्ट कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे तिसर्‍या दिवशीही मुंबईकरांचे हाल होणार असेच दिसत आहे.

राज्य सरकारने काढले परिपत्रक
बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपामुळे मुंबईकराचे हाल होऊ नये व प्रवासी वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस आणि मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी एक परिपत्रक काढून हे आदेश जारी केले आहेत.

सेनेची माघार नावापुरती
बेस्टमध्ये शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने संपाला नैतिक पाठिंबा दिला होता.परंतु मंगळवारी दुपारनंतर या संपामध्ये सेना सहभागी नसल्याचे स्पष्ट करण्यात आल होते. मुंबईकरांचे हाल होऊ नये म्हणून बेस्ट कामगार सेनेने बुधवारी पोलीस संरक्षणात ५०० बेस्ट बसेस चालविण्यात येतील, अशी घोषणा केली होती. मात्र बेस्ट कामगार सेनेला या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. बुधवारी सकाळी फक्त १९ चालक आणि १४ वाहक उपस्थित होते. त्यामुळे बेस्ट कामगार सेनेच्या घोषणेचा काही उपयोग झाला नाही. उलट बेस्ट कामगार सेनेच्या या घोषणेमुळे कामगार सेनेेमध्ये असलेल्या काही बेस्ट कर्मचार्‍यांनी संघटनेचा राजीनामा दिला आहे.

संप पुकारून मुंबईकरांना वेठीस धरू नये. बेस्ट कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा. त्यानंतर चर्चेच्या माध्यमातून बेस्ट कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवणे शक्य होईल, जर गुरुवारपर्यंत कुणी कामगार कामावर हजर न राहिल्यास सुमारे ४०० कामगारांना कामावरून बडतर्फ करण्यात येईल. – सुरेंद्र बागडे, महाव्यस्थापक, बेस्ट

कर्मचारी एकूण उपस्थित

बस चालक – ६६४४ १९
बस वाहक – ७०२१ १४
बस इन्स्पेक्टर-३६४ १००
बस स्टार्टस -४३३ ३७

First Published on: January 10, 2019 5:38 AM
Exit mobile version