खुशखबर! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक १०० डबल डेक बसेस!

खुशखबर! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक १०० डबल डेक बसेस!

अखेर बेस्टला ४०५ कोटींचे अनुदान देण्यास पालिका सभागृहात मंजुरी

बेस्ट उपक्रमामधील मानाचा तुरा असलेल्या डबल डेकर बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय अखेर बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी बेस्टकडून अत्याधुनिक शंभर डबल डेकर बस खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या सर्व डबल डेकर बस गाड्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दोन दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील असणार आहेत.

बेस्ट उपक्रमातील १९९३ पर्यंत तब्बल ९०१ डबल डेकर बसगाड्या होत्या. या गाड्यांची लोकप्रियता प्रवासी आणि पर्यटकांमध्ये प्रंचड होती. मात्र, त्यानंतर मुंबईच्या विकासाबरोबर उड्डाणपुलांची संख्या वाढली. त्यामुळे या डबल डेकर बसेसवर मर्यादा आल्या आहेत. तसेच आर्थिक चणचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला या बस गाड्यांच्या देखभालीचा खर्च डोईजड झाला होता. परिणामी सध्या १२० डबल डेकर बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात शिल्लक राहिल्या आहेत. या बस गाड्यांपैकी वयोमर्यादेनुसार बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील ७० डबल डेकर बसगाड्या काही महिन्यांतच म्हणजे मार्च २०२१ पर्यंत भंगारात निघणार आहेत. परिणामी डबल डेकर बस गाड्यांची संख्या कमी होणार आहे. यामुळे बेस्टच्या ताफ्यात नवीन शंभर डबल डेकर बसेस घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून त्यासंबंधीत निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच या शंभर बसेस ऑटोमॅन्युअल ट्रान्समिशन शिप्टच्या (ऑटोमॅटिक गिअर) असणार आहेत, अशी माहिती बेस्टच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

काय असणार सुविधा?

नवीन डबल डेकर बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक डेस्टिनेशन बोर्ड, तसेच बसमध्ये प्रवाशांसाठी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन स्वयंचलित दरवाजे असणार आहेत. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उजव्या बाजूला आपातकालीन दार असणार आहे. तसेच दोन जिने असणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा, दोन वाहकांसाठी इंटरकम्युनिकेशन सिस्टिम असणार आहेत. यामुळे डेकवर असलेल्या वाहकाला सूचना देता येणार आहे.

First Published on: November 15, 2020 7:21 PM
Exit mobile version