नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्य पद रद्द

नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्य पद रद्द

नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्य पद रद्द

भाजपने स्थायी समितीवर नामनिर्देशित सदस्य असलेल्या भालचंद्र शिरसाट यांची निवड केली. परंतु नामनिर्देशित नगरसेवकाचे सदस्य पद हे कायद्यानुसार स्थायी समितीवर नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत शिरसाट यांचे सदस्य पद रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे शिरसाट यांच्या निवडीला आक्षेप घेतला. याला काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा देत शिरसाट यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, याप्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

कोविडच्या काळात स्थायी समितीची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे सात महिन्यानंतर स्थायी समितीची बैठक महापलिका सभागृहात प्रत्यक्ष आयोजित करण्यात आली. सात महिन्यातील ५९० विषय समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. या बैठकीला बुधवारी सुरुवात झाल्यानंतर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी शिरसाट यांची स्थायी समिती सदस्य पद निवड चुकीची असल्याचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक हे मतदार राजांनी निवडून पाठवलेले असतात. तर पाच नामनिर्देशित सदस्यांची निवड ही बेस्ट व शिक्षण समिती सदस्य पदी केली जाऊ शकते. तसेच नामनिर्देशित सदस्याला ज्ञान व अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच जो सदस्य मतदानात सहभागी होऊ शकत नाही, त्या नामनिर्देशित नगरसेवकाची स्थायी समिती सदस्य पदी निवड केली जाऊ शकत नाही, असा आक्षेप त्यांनी या मुद्द्याद्वारे केला. याला पाठिंबा देताना, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका अधिनियमातील कलम ५ – १ – बी व ४३ नुसार महापौरांनी सदस्य पदाची घोषणा केली. पण ते मतदान करू शकतात, असे महापौर म्हणाल्या नाहीत. नगरसेवक म्हणून जे निवडून आले त्यांचीच स्थायी समिती सदस्य पदी निवड केली जाऊ शकते, असे सांगितले.

तुमचे के.पी. नाईक कसे होते मग?

२८ सप्टेंबर २०२० ला स्थायी समिती सदस्य म्हणून पालिका चिटणीस विभागाने त्यांना घोषित केले. यापूर्वी शिवसेनेचे के.पी. नाईक स्थायी समिती सदस्यपदी होते. त्यावेळी कोणी आक्षेप का घेतला नाही. त्यामुळे हे सुडाचे राजकारण केले जात असून मुंबईकरांच्या मुळ समस्यांना बगल दिली जात आहे. शिवसेनेने हे चुकीचे केले असून यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

शिरसाट यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड कायद्यानुसार होऊ शकत नाही. त्यामुळे शिरसाट यांना समितीत बोलण्याचा काही अधिकार नाही. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शिरसाट यांची बाजू मांडली असली तरी स्थायी समिती अध्यक्षांनी योग्य तो निर्णय जाहीर करावा, असे सपाचे गटनेते रईस शेख म्हणाले. यावेळी शिंदे यांच्या आरोपांवर उत्तर देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, ‘त्यावेळी कोणी विरोध केला नसेल, ती त्यांची चूक आहे’. असे सांगितले. विशाखा राऊत यांनी आज हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच विधी विभागाकडून बाजू समजून घेतली आहे. त्यामुळे नामनिर्देशित नगरसेवक शिरसाट यांची स्थायी समिती सदस्य पदाची निवड चुकीची असून ती रद्द करत असल्याचे जाधव यांनी जाहीर केले.

शिरसाट हे नामनिर्देशित नगरसेवक असून ते स्थायी समिती सदस्य होऊ शकत नाही. त्यामुळे आपले सदस्य पद रद्द करण्यात आले असल्याने आपण सभागृहाबाहेर जावे, अशी विनंती यशवंत जाधव यांनी केली. परंतु जाधव यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत शिरसाट सभागृहात बसून राहिले. आपण सदस्य नाही, आपण सभागृहाबाहेर जावे, अन्यथा बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा जाधव यांनी शिरसाट यांना दिला.

भालचंद्र शिरसाट यांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार देताना असे सांगितले की, माझी नियुक्ती कायद्याच्या चौकटीत महानगरपालिकेने केलेली आहे. त्यामुळे माझ्या नियुक्तीवर आक्षेप अथवा हरकत घेणे व नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार कायद्याने केवळ महानगरपालिकेलाच आहे. स्थायी समितीला तसा अधिकार नाही. आणि म्हणून आजतागायत महापालिकेने माझी नियुक्ती रद्द न केल्यामुळे मी स्थायी समिती सदस्य आहे तसेच मी कोणतेही गैरवर्तन केलेले नाही त्यामुळे आपण कलम ३६ (ह) अंतर्गत कुठलीही शिक्षा ठोठावलेली नाही. म्हणून मी सभागृहाबाहेर जाणार नाही. अखेर भाजप सदस्यांनी शिवसेनवच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या गोंधळात अध्यक्षांनी सभेचे कामकाज तहकूब केले.

First Published on: October 21, 2020 7:07 PM
Exit mobile version