सोळा कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भामट्याला अटक

सोळा कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भामट्याला अटक

आरोपीला अटक

अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील एका खाजगी कंपनीला सोळा कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी क्रिआर्ज इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सहाय्यक कार्यकारी अधिकारी अल्ताफ गुलजार अहमद हुसैन याला शुक्रवारी गुन्हे शाखेच्या आर्थिक विंगच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चार हिंदी चित्रपटाच्या वितरणाच्या आमिषाने आरोपीच्या कंपनीने तक्रारदार कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात प्रेरणा विरेंद्रकुमार अरोरा, प्रोतिमा अरोरा, अर्जुन उर्फ निमित कपूर आणि अन्वर अली यांचा समावेश आहे. नलिनी दास या अंधेरीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या पद्मा इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कंपनीला क्रिआर्ज कंपनीने संपर्क साधून त्यांना केदारनाथ, फन्ने खान, बत्ती गुल मीटर चालू आणि राणी (सपना दिदी) या चार हिंदी चित्रपटात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावेळी त्यांना चित्रपटाच्या वितरणासह चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झालेला नफा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. हा प्रस्ताव आवडल्याने या कंपनीने आरोपींच्या कंपनीशी चारही चित्रपटांसाठी करार केले होते. करारादरम्यान त्यांनी त्यांना सोळा कोटी पस्तीस लाख रुपये दिले होते. मात्र काही महिन्यानंतर नलिनी दास यांना आरोपींनी त्यांच्यासह इतर दोन कंपन्यांशी अशाच प्रकारे करार करून त्यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांत संबंधित कंपनीच्या मालकासह संचालक आणि इतर अधिकार्‍यांविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत शुक्रवारी अल्ताफ हुसैन याला पोलिसांनी अटक केली.

अल्ताफ हा तामिळनाडूचा रहिवासी असून तो क्रिआर्ज कंपनीत सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या संपूर्ण घोटाळ्यात त्याचा सहभाग होता. या तिन्ही कंपन्यांना चित्रपटात गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना चित्रपटाच्या वितरण हक्काचे आमिष दाखवून गंडा घालण्यात आला होता. तिन्ही कंपनींकडून त्यांनी सुमारे 66 कोटी रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध दिल्लीतही अशाच एका गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत चार आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

First Published on: December 25, 2018 4:05 AM
Exit mobile version