८ महिन्यांत एसटीत हेराफेरीची २९ हजार प्रकरणे उघडकीस

८ महिन्यांत एसटीत हेराफेरीची २९ हजार प्रकरणे उघडकीस

एसटी महामंडळ

भाडे वसूल करून तिकीट न देणे, वाहकाकडे तिकिटांच्या तुलनेत कमी किंवा जास्त पैसे असणे, प्रवाशांना तिकीट न देणे, सुटे पैसे परत न करणे, चालकांनी थांबा सोडून इतरत्र गाडी थांबविणे, बेकायदा पार्सलची वाहतूक करणे अशा हेराफेरीची गेल्या आठ महिन्यांत एसटी महामंडळाने २९ हजार ८१५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या प्रकरणात दंड म्हणून चालक-वाहकांकडून १२ लाख ६४ हजार ८२ रुपये आणि प्रवासी भाडे वसूल करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणांना पूर्णपणे आळा बसावा म्हणून एसटी महामंडळाकडून नुकतीच १०३ नवीन जीप आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. त्याच्या माध्यमातून एसटी मार्ग तपासणी महामंडळाकडून प्रभावी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राची लोकवाहिनी आणि ग्रामीण भागाची लालपरी अर्थात एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे. मात्र वाहकांकडून अपहाराची मालिका सुरूच आहे. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कालावधीत म्हणजे एकूण ८ महिन्यांत एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाने ७ लाख ७० हजार ५२३ एसटी गाड्यांची तपासणी केली. तर ३ लाख ४४ हजार ९७५ एसटीच्या वाहकांची तपासणी केली. त्यावरून एकूण २९ हजार ८१५ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.

ज्यात तिकीट न देणे, प्रवाशांना तिकिटाचे उरलेले पैसे परत न करणे, तिकिटांच्या तुलनेत वाहकाकडील रोकड कमी अथवा जास्त असणे, बेकायदा पार्सलची वाहतूक, असे प्रकार चालक-वाहक करीत असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात या कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई करत चालक-वाहकांकडून ६ लाख २२ हजार ७९१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वसूल केलेले प्रवासी भाडे ६ लाख ४१ हजार २१९ रुपये इतके आहे. अशाप्रकारे मागील आठ महिन्यांत एसटी महामंडळाने १२ लाख ६४ हजार ८२ रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

चालक-वाहकांवर महसूल तुटीचा ठपका

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, काही वेळा चालक आणि वाहकाकडून प्रवासादरम्यान चुकीचे प्रकार केले जातात. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी पथकाच्या माध्यमातून एसटी गाड्यांची तपासणी केली जाते. एसटीला गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठा आर्थिक तोटा झाला आहे. महसुलात प्रचंड घट झाल्याने महामंडळाने कारणमीमांसा सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चालक आणि वाहकांवर महसूल तुटीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ मार्ग तपासणी गतिमान करण्यासाठी १०३ नवीन जीप महामंडळाने खरेदी केल्या आहे.

First Published on: April 15, 2019 5:45 AM
Exit mobile version