दुसर्‍या प्रवाशाच्या नावे ट्रान्सफर करता येणार तिकीट

दुसर्‍या प्रवाशाच्या नावे ट्रान्सफर करता येणार तिकीट

Railway

प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावे आरक्षित केलेले तिकीट आता त्या व्यक्तीच्या स्वखुशीने आणि परवानगीने दुसर्‍या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करता येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना जरी दिलासा मिळणार असला तरी त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार होण्याची शक्यता वाढणार आहे.

भारतीय रेल्वेने कात टाकण्यास सुरुवात केली असून ऑनलाईन अ‍ॅपद्वारे सोप्या पद्धतीने तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. शिवाय प्रवाशाने तक्रार केल्यास त्यावर तातडीने सेवाही पुरविण्यात येत आहे. त्यातच आता रेल्वेने एक चांगला निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीच्या नावे आरक्षित केलेले तिकीट यापुढे दुसर्‍या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करता येणार आहे. अनेकवेळा दोन-तीन महिने आधी आपण रेल्वे प्रवासाचे तिकीट काढतो. मात्र, काही कारणांमुळे आपण जाऊ शकत नाही. यामुळे एक दिवस आधीच तिकीट रद्द करावे लागते. या तिकिटाचे रद्द करताना काही पैसे कापून घेतले जातात.

मात्र, आता हे तिकीट दुसर्‍या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करण्याची सोय रेल्वेने दिली आहे. यासाठी प्रवासाच्या 24 तास आधी काही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. तसेच या सेवेचा लाभ मात्र एकदाच मिळणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आरक्षित तिकिटाची झेरॉक्स किंवा प्रिंट आऊट काढावी लागणार आहे. यानंतर जवळच्या रेल्वे स्थानकावर जाऊन ज्या व्यक्तीला हे तिकीट ट्रान्सफर करायचे आहे, त्याचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.

तसेच तिकीट खिडकीवरील कर्मचार्‍याकडे प्रवाशाचे नाव बदलण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. नात्यातील व्यक्ती असल्यास नात्याचे ओळखपत्र म्हणजेच रेशनकार्ड, आधारकार्ड आदी दाखवावे लागणार आहे.

First Published on: February 18, 2019 6:07 AM
Exit mobile version