पुलाच्या मुद्यावरून अध्यक्षांविरोधात भाजप नगरसेविका आक्रमक

पुलाच्या मुद्यावरून अध्यक्षांविरोधात भाजप नगरसेविका आक्रमक

स्थायी समितीच्या बैठकीत तू तू- मै मै झाली.

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष आणि भाजपच्या दोन नागरसेविकांमध्ये चांगली जुंपली. दादरच्या टिळक रेल्वे पुलाच्या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी अध्यक्षांनी, हँकॉक पुलाच्या प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी करणार्‍या भाजपचा समाचार घेतला. यावर भाजपच्या नगरसेवकांनी आपला विरोध प्रस्तावाला नसून त्याच्यातील फेरबदलाच्या कंत्राट कामांच्या खर्चाला असल्याचे सांगितले. यावरून अध्यक्ष आणि नगरसेविकांमध्ये तीव्र बाचाबाची झाली. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका आक्रमक झाल्या आणि त्यांनी अध्यक्षांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर अध्यक्षांनीही आपला बेशिस्तपणा खपवून घेणार नाही. आवाज थांबवा नाही तर सुरक्षा रक्षकांना सांगून बाहेर काढायला लावू, असा इशारा दिला. या वक्तव्यामुळे अध्यक्षांना कोंडीत पकडण्याची रणनिती भाजपने आखण्यास सुरुवात केली आहे.

दादर टिळक उड्डाणपूलाच्या पदपथाचा काही भाग दोन दिवसांपूर्वी खचला. याबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करून हे पूल फार जुने असल्याने कोणत्याही क्षणी ते बंद करावे लागेल. त्यामुळे या पुलाला पर्यायी पूल बांधण्याची मागणी आपण सातत्याने करत आलो आहोत. पण प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे या पुलाची डागडुजी आणि पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा देत हे पूल जुने झाल्याने त्याची आयुर्मर्यादा संपुष्टात आल्याचे पत्र महापालिकेला ब्रिटीश सरकारने पाठवले आहे. त्यामुळे पर्यायी पुलाची उभारणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी याला पाठिंबा देत, विशाखा राउत सातत्याने या पुलाबाबत बोलत आहेत. मुंबईतील पुलांची कामे पूर्ण व्हायला हवीत. परंतु दोन-दोन वर्षे पुल पाडून ठेवले जात आहेत आणि ते पूर्ण होत नाहीत. तर मुंबईचा विकास आपण कसा करणार असा सवाल त्यांनी केला.
शिरवाडकर यांच्या विधानानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एकाबाजुला पुलांचे बांधकाम पूर्ण व्हावे, असे सांगता आणि दुसरीकडे पुलाला विरोध करत आहात. हँकॉक पूल पाच वर्षांपासून पाडून ठेवला आहे. त्यामुळे हे पूल वेळेत सुरु व्हावे,अ से आपल्याप्रमाणे स्थानिक नगरसेवकांना वाटत असते. परंतु एकाबाजुला अशी भूमिका मांडायची आणि दुसरीकडे हँकॉक पूलाला विरोध करायचे हे योग्य नाही, अशा शब्दात समाचार घेतला. यशवंत जाधव यांच्या विधानामुळे भाजपच्या राजेश्री शिरवाडकर आणि ज्योती अळवणी आक्रमक झाल्या आणि आमचा विरोध पुलाला नाही तर त्यातील वाढीव खर्चाच्या बांधकामाला आहे. त्या वाढीव कामांची माहिती मिळावी म्हणूनच आम्ही याची माहिती येईपर्यंत हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी केली. यावरून मग अध्यक्ष आणि दोन्ही नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आवाजाचा पारा दोन्हीकडून वाढू लागला. त्यामुळे अखेर अध्यक्षांचाही पारा चढला. ही प्रभाग समिती नाही. स्थायी समिती आहे. आधी सभाशास्त्र शिकून घ्या, कसे बोलायचे ते. आवाज कमी करा, नाही तर सुरक्षा रक्षकांना बोलावून बाहेर काढायला लावू, असा इशारा दिला. अध्यक्षांच्या या विधानामुळे दोन्ही नगरसेविका अधिकच आक्रमक झाल्या आणि त्यांनी हिंमत असेल तर आम्हाला बाहेर काढू दाखवाच,असे आव्हान त्यांनी अध्यक्षांना दिले. दोघांमधील हमरीतुमरी सुरुच होती. अखेर अध्यक्षांनी नमते घेत अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांना पुलाच्या मुद्दयावर बोलण्याच्या सूचना केल्या. मात्र, सभा संपल्यांनतर या दोन्ही नगरसेविकांनी महापालिका चिटणीस यांना गाठून, आम्हाला बाहेर काढण्याचा अधिकार आहे, याचा खुलासा करण्याची मागणी केली. तसेच अध्यक्षांनी जे विधान केले ते पटलावर घेण्यात यावे, असाही दम भरला. दरम्यान, भाजपचे महाराष्ट् प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी याचा तीव्र निषेध करत हा राग कसला असा सवाल केला आहे.


हेही वाचा – सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? सेना-राष्ट्रवादीचा सवाल

टिळक पूलाचे बांधकाम लवकरच

टिळक पुलाच्या पादचारी भाग काही प्रमाणात खचला आहे. त्यामुळे रेल्वेच्या अधिकार्‍यांसमवेत याची तपासणी केली जात आहे. यानंतर पुलाचे मोठ्या स्वरुपातील दुरुस्तीचे काम हाती घेतली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील प्रत्येक पुलाचा अहवाल लवकरच समितीपुढे सादर केला जाईल, असेही सांगितले.

 

First Published on: February 26, 2020 8:34 PM
Exit mobile version