आता मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार; आदित्य ठाकरेंच्या मैदानात फडणवीसांचे सेनेला आव्हान

आता मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार; आदित्य ठाकरेंच्या मैदानात फडणवीसांचे सेनेला आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील भ्रष्टाचाराच्या हंड्या फुटण्यास सुरुवात झाली, आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडीही आम्ही फोडणारच,असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला दिले आहे.

देशभरात आज दहीहंडी उत्साह शिगेला पोहोचला आहे. यात महाराष्ट्रासह मुंबईतही तब्बल दोन वर्षांनंतर गोविंदा दहीहंडीचा आनंद लुटत आहेत. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईतील अनेक ठिकाणच्या दहीहंडी उत्सवांना भेटी देत आहे. मात्र वरळीतील जांभोरी मैदानातील त्यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. कारण भाजपचा कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे.

या जांभोरी मैदानात दरवर्षी सचिन अहिर हे दहीहंडीचे करतात, मात्र शिवसेनेतील स्थानिक नेत्यांवर कुरघोडीचे राजकारण करत यंदा भाजपने जांभोरी मैदानात हंडीचे आयोजन केले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुढाकाराने यंदा या ठिकाणी भाजपाने दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली. दरम्यान या दहीहंडीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज भेट देत भ्रष्ट्राचाररुपी प्रतिकात्मक हंडी फोडली, यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दहीहंडी खेळाला आमच्या सरकारने साहसी खेळाचा दर्जा दिला. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर गोविंदा पथकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा सण उत्साहात साजरा होतो, त्यामुळे आजचा दिवस राजकारणावर बोलण्याचा नाही, पण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भ्रष्टाचाराच्या हंड्या फोडण्यास सुरुवात झाली आहे. आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी आम्ही यावेळी फोडणार आहोत आणि त्यातील लोणी गोरगरिबांपर्यंत पोहोचवणार आहोत. असंही फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्र्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार राजहंस सिंह, उत्तर भारतीय महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, संजय उपाध्याय आणि आयोजक संतोष पांडे देखील उपस्थित होते.


Dahi Handi 2022 : मुंबईत 12 गोविंदा जखमी, 7 जणांवर उपचार सुरू


First Published on: August 19, 2022 3:30 PM
Exit mobile version