कोकण काय गडचिरोली, नंदुरबारसारखं लांब आहे का? – फडणवीस

कोकण काय गडचिरोली, नंदुरबारसारखं लांब आहे का? –  फडणवीस

निसर्ग चक्रीवादाळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अजूनही लोकांनी मदत पोहोचलेली नाही यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रीवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकावर टीका केली आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणालेत, कोकणात अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना मदत मिळालेली नाही. तर ज्यांना मदत मिळाली आहे, ती अत्यंत तुटपुंजी असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान मदत न मिळूनही कोकणी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो म्हणतो मदत नको पण केवळ कचरा साफ करून द्या. पण ही मुलभूत कामेही करण्यास प्रशासन तयार नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. आज एक महिना उलटूनही कोकणात वीज नाही. सरकारच्या उदासीनता आणि निष्काळजीपणाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण म्हणायचे? शेकडो गावांमध्ये वीज नसली तरी भरमसाठ बिले पाठवणे हा तर चक्रीवादळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणालेत. कोकणवासियांना सध्या लहानसहान गोष्टींसाठीही एक-एक महिना वाट पाहावी लागत आहे. कोकण हा मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा कोकणाची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी कोकणाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

First Published on: July 3, 2020 10:15 PM
Exit mobile version