स्थायी समितीच्या बैठकीवरून पुन्हा भाजपकडून शिवसेना टार्गेट

स्थायी समितीच्या बैठकीवरून पुन्हा भाजपकडून शिवसेना टार्गेट

स्थायी समितीच्या बैठकीवरून पुन्हा भाजपकडून शिवसेना टार्गेट

संपूर्ण मुंबईत लॉकडाऊन असतानाही महापालिका स्थायी समितीची बैठक येत्या ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्यामुळे भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केले आहे. सध्या परिस्थिती युध्दजन्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असताना, तसेच कोणत्याही प्रकारचे तातडीचे आणि निकडीचे प्रस्ताव नसताना स्थायी समितीची बैठक का घेण्यात येते अशी विचारणा करत पालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसले अंडरस्टँडींग सुरू आहे, असा सवाल केला आहे. दरम्यान, सध्याचा काळ कसोटीचा असून राजकारण करण्याचा नाही, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपला प्रेमाचा सल्ला दिला.

सभा घेण्याचा अट्टाहास का?

भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र पाठवून स्थायी समितीच्या बोलण्यात आलेल्या सभेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थायी समितीची सभा गेल्या आठवड्यात पार पडली तरी पुन्हा ३१ मार्च रोजी सभा बोलावण्यात आली आहे. यापूर्वी पार पडलेल्या सभेत एक विषय आरोग्याचा सोडला तर अन्य कोणतेही विषय तातडीचे नव्हते. तरीही सभा घेण्याचा अट्टाहास का?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे महापौर म्हणून या प्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

सध्याचा काळ कसोटीचा, राजकरण करण्याचा नाही

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्राविषयी बोलतांना, मागील बैठकीत कोरोनाच्या मुद्दयावर चर्चा झाल्याचे सांगत सर्व प्रकारच्या सुविधा, उपाययोजना आदींचा विचार करून अन्य कोणतेही प्रस्ताव न घेण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आल्याचे सांगितले. नालेसफाई, पर्जन्यजलवाहिनी दुरुस्ती, गटारांची बांधणी, संभाव्य पुरपरिस्थिती आदींचा आढावा घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या निमित्ताने मुंबईकरांना वाऱ्यावर सोडणे योग्य ठरणार नाही. नाही तर मग सध्या झोपलेले पहारेकरी रेडिओ जॉकीला सुपाऱ्या देऊन गाणी तयार करायला सांगितली, यात शंका नसल्याचे सांगत त्यांनी भाजपवर टिका केली. सध्याचा काळ कसोटीचा आहे. राजकरण करण्याचा नाही असे सांगत यशवंत जाधव यांनी परस्परावरील मतभेद विसरुन संकटावर मात करत शहरवासियांना जीवन सुखकर करणे अधिक आवश्यक असल्याचा सल्लाही भाजपला दिला आहे.

रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना जेवण उपलब्ध करून द्या

केईएम रुग्णालयासह इतर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण मिळत नाही. तसेच कर्फ्युमुळे नातेवाईकांना जेवणाचा डबा आणता येत नाही. तसेच बाहेरचे काही मिळत नाही. महापालिकेच्या कॅन्टीनमधून केवळ रुग्णांना आहार देण्यात येतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये शिवभोजन थाळी योजनेतंर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना थाळी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. अथवा माफक दरात रुग्णांच्या दोन नातेवाईकांना येथील कॅन्टीनमध्ये आहार उपलब्ध करून देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: अन्नदानासाठी अनेक दात्यांचे हात पुढे सरसावले


 

First Published on: March 29, 2020 11:07 PM
Exit mobile version