… तर बेस्ट कर्मचाऱ्यांचे उग्र आंदोलन, बेस्ट उपक्रम बंद पडणार – भाजपाचा इशारा

… तर बेस्ट कर्मचाऱ्यांचे उग्र आंदोलन, बेस्ट उपक्रम बंद पडणार – भाजपाचा इशारा

मुंबईकरांचा प्रवास आणखीन 'बेस्ट' होणार

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात संतप्त बेस्ट कर्मचारी उग्र आंदोलन करून बेस्ट उपक्रम बंद पाडतील , असा इशारा भाजप प्रणित कामगार संघटनेचे नेते व बेस्ट समिती अध्यक्ष सुनील गणाचार्य यांनी दिला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि न्याय हक्कासाठी २१ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास वडाळा आगार येथे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. यावेळी, पत्रकारांशी बोलताना, कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी, वरीलप्रमाणे बेस्ट प्रशासनाला इशारा दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रम कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. याला बेस्ट उपक्रम व सत्ताधारी शिवसेना कारणीभूत आहे, असा आरोप सुनील गणाचार्य यांनी केला आहे. तसेच, बेस्ट परिवहन विभागाबरोबरच वीज विभागही यंदा कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात गेला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेचा एक अंग असून बेस्टचा अर्थसंकल्प हा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. बेस्ट बसचालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात यावा. बेस्टने स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखावा. कोविड चार्जशीट रद्द करण्यात यावी. कोविड काळात मुंबईकरांना बेस्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्यावा. बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान ( दिवाळी बोनस) मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आज वडाळा आगार येथे भाजपप्रणित कामगार संघाटनेकडून शांततेत निदर्शने करण्यात आली.

बेस्ट कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात कर्मचारी उग्र आंदोलन करून बेस्ट बंद करतील, असा इशारा भाजपचे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिला.


हेही वाचा – CIDCO Lottery : खूशखबर ! दिवाळीत परवडणाऱ्या दरात मिळणार नवी मुंबईत घर ; सिडकोकडून ४९०० घरांसाठी लॉटरी

First Published on: October 21, 2021 7:23 PM
Exit mobile version