भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता

भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता

भाजप-सेना

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दिल्लीत होत असून या बैठकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे कमळ फुलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये आपल्या जुन्या सर्व मित्रपक्षांना पुन्हा एनडीएमध्ये परतण्याचे आवाहन केले आहे. तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये युतीच्या चर्चेत आम्ही नेमके कितव्या थरावर आहोत, हे दिल्लीत ठरेल, असे सूचक उद्गार काढले.

दोन दिवसांपूर्वीच ठरले होते
युतीचा निर्णय दोन दिवसांपूर्वी झाला होता, असे समजते. पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना तातडीने बोलावून घेण्यात आले होते. मध्यरात्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बरोबरच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. युती आमच्या टर्म आणि कंडिशनवर झाली पाहिजे, या उद्धव ठाकरे यांची अट भाजपकडून मान्य झाल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब झाले, असे सांगण्यात येते.

फडणवीस- उद्धव गुप्त भेट
युती होणार की नाही, अशी चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे कळते.

तर युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, आता फक्त त्याची घोषणा बाकी आहे, असे विधान दानवे यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदींची सत्ता राखली जावी, यासाठी दाखवलेला आपला सर्व अहंकार गुंडाळून ठेवत त्यांनी आता आपल्या मित्रपक्षांना साद घालायला सुरुवात केली आहे. या दृष्टीने दिल्लीतील बैठक महत्त्वाची असून त्याचे पडसाद गुरुवारी दिसून आले.

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात म्हाडाच्या मुक्तछंद महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी आदित्य म्हणाले, दहीहंडीच्या खेळात एक टीम असते. एकमेकांवर विश्वास असतो. आम्ही कोणत्या थरावर आहोत, हे दिल्लीत ठरणार आहे. आमचे काही वाद, मतभेद असतील त्याबद्दल मी काही स्पष्टीकरण देणार नाही.

औरंगाबादला पत्रकारांशी संवाद साधताना दानवे यांनी युती झाली असल्याचे सांगत आतापर्यंत झालेल्या वादांवर पडदा टाकला. मैत्रीमध्ये वाद-विवाद असतात. मात्र आम्ही सुरुवातीपासून आमच्या मित्रपक्षांबरोबर मैत्रीचा हात पुढे करून आहोत. आता फक्त शिवसेनेबरोबर युतीची घोषणा बाकी आहे. जागा आणि इतर सर्व गोष्टी ठरल्या आहेत.

First Published on: January 11, 2019 6:59 AM
Exit mobile version