महापौरांसह माझ्या बदनामीचा भाजपचा कट – यशवंत जाधव

महापौरांसह माझ्या बदनामीचा भाजपचा कट – यशवंत जाधव

धनदांडग्यांसाठी काम करणारा भाजप हा गोरगरिबांसाठी काम करणार्‍या शिवसेनेची जाणीवपूर्वक बदनामी करत आहे. यातूनच महापौर आणि माझी वैयक्तिक बदनामी करणारे षडयंत्र भाजपकडून रचले जात आहे. त्याचाच भाग म्हणून अर्वाच्य, अश्लील आणि धमकावणारे मेसेज केल्याचे खोटे आरोप भाजप पक्षनेते विनोद मिश्रा यांच्याकडून करण्यात येत आहेत. आपण कोणत्याही प्रकारचे संभाषण करून धमकावले नसल्याचा सांगत मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष व शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी मिश्रा यांचे फेटाळून लावले. तसेच या सर्वांना प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ पडली तर आपण कायदेशीर कार्यवाही देखील करण्यास कचरणार नाही, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर अर्वाच्य, अश्लील संभाषण करून धमकावल्याचे आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केले आहेत. त्यासंदर्भात सोमवारी जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले. मिश्रा यांनी सादर केलेले व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग खोटारडे आणि एडीट केलेले आहेत. अन्य व्यक्तीच्या फोन क्रमांक माझ्या नावाने सेव्ह करून व्हॉट्सअ‍ॅपला माझा फोटो डीपी ठेऊन हे चॅट तयार केले आहे. शनिवारी केलेली चॅट दुसर्‍या दिवशी मी डिलीट केल्याचे मिश्रा यांचे म्हणणे हास्यास्पद तसेच खोटारडेपणा दर्शवणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट ठराविक कालावधीतच डिलीट करावी लागते. दुसर्‍या दिवशी तसे करणे शक्यच नाही.

मागील काही दिवसांमध्ये भाजपने वैयक्तिकरित्या माझी तसेच मुंबईच्या महापौरांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून माझ्यावर नव्याने आरोप केले असून, तथ्य नसल्याचे जाधव यांनी सांगितले. खिचडी घोटाळ्यातून मिश्रा यांनी फ्लॅट खरेदी केल्याचे मी कोठेही म्हटलेले नाही. कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग तसेच घोटाळ्यातून फ्लॅट खरेदीच्या आरोपाबाबत मिश्रा यांना कोठेही तक्रार करण्याचे पर्याय खुले असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत भाजपला शिवसेनेने रोखून धरले. त्याच्या नैराश्यातून काही दिवसांपासून त्यांनी आमची बदनाम करण्याची मोहीम उघडली आहे, हे सर्वांना आता कळून चुकले आहे. भाजप करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. 209 प्रभागामध्ये महापालिकेची विहित ई-निविदा प्रक्रिया राबवून गोरगरिबांसाठी निधीचा सदुपयोग केल्याचे सांगत जाधव यांनी मिश्रा यांचे आरोप फेटाळून लावले. मुंबईकरांच्या हितासाठी तसेच विकासासाठी सत्ताधारी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये सर्वांनी साथ द्यावी आणि गलिच्छ राजकारण करु नये, असे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले.

विरोधी पक्षांना 400 कोटींचा निधी वितरित
नगरसेवकांना निधी वितरण असमान पद्धतीने केल्याचा मिश्रा ह्यांचा आरोपही पोकळ आहे. स्थायी समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय नगरसेवकांना योग्य पद्धतीने निधी वितरीत केला आहे. मंजूर केलेल्या ७०० कोटींच्या निधीपैकी ४०० कोटी निधी हा भाजपसह विरोधी पक्षाला दिला आहे. यामध्ये भाजपच्या वाटेला १७३ कोटी आले. तरीही मिश्रा यांना निधी मिळाला नसल्यास त्यांनी त्यांच्या पक्षाला जाब विचारावा. भाजपने महापालिका प्रशासनाचीही दिशाभूल केली आहे. स्थायी समितीने निधी मंजूर केल्यानंतर भाजपच्या आरोपांमुळे आयुक्तांनी सुमारे ३९० कोटींचा निधी रोखून धरला होता. आपण स्वतः आयुक्तांना योग्य माहिती पुरवल्यानंतर त्यांनी संपूर्ण निधी प्रदान केल्याचेही जाधव यांनी सांगितले.

First Published on: February 15, 2021 10:12 PM
Exit mobile version