Lok Sabha 2024 : दादा वगैरे नसून डरपोक, पळपुटे आहेत, ठाकरे गटाचे अजित पवारांवर टीकास्त्र

Lok Sabha 2024 : दादा वगैरे नसून डरपोक, पळपुटे आहेत, ठाकरे गटाचे अजित पवारांवर टीकास्त्र

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नंबरचे भ्रष्ट आणि घोटाळेबाज असून त्यांची जागा तुरुंगात असल्याची डरकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे जाणकारांनी फोडली होती. त्यामुळे तुरुंगवारी वाचविण्यासाठी अजित पवार हे मोदी-फडणवीस भजन मंडळात सामील झाले हे सत्य आहे. यापुढे अजित पवारांना कोणी ‘दादा’ वगैरे शब्दांच्या उपाध्या लावू नयेत. ते दादा वगैरे नसून डरपोक, पळपुटे आहेत, असे जोरदार टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे. (Lok Sabha Elections 2024: Thackeray group criticizes Ajit Pawar as a coward)

डरपोक लोकच धमक्या देऊन मस्तवालपणा दाखवतात. अजित पवार तेच करीत आहेत. त्यांचे राजकारणातील स्वकर्तृत्व शून्य आहे, हे त्यांना 4 जूनच्या निकालानंतर कळेल. आपणच महाराष्ट्राचे विकास पुरुष आहोत. बारामतीसह सर्व राज्याचा विकास फक्त ‘मी’ म्हणजे ‘मीच’ केला. शरद पवार वगैरे सर्व झूठ असल्याचे ते बोलत आहेत; पण जरंडेश्वर कारखाना, शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा आणि त्यांच्याबरोबरच्या डरपोक सहकाऱ्यांचे कोट्यवधींचे घोटाळे म्हणजेच विकास काय? हा प्रश्न जनतेने त्यांना विचारायला हवा, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

सत्ता आणि सरकारी संरक्षण नसेल तर अजित पवारांसारख्या लोकांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी होईल. विरोधी पक्षनेता असलेला माणूस पलटी मारतो आणि सरकारात घुसतो हे लोकशाहीसाठी भयंकर कृत्य असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

अजित पवार म्हणतात, ‘‘कुणाला किती निधी द्यायचा हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे विकासासाठी भरपूर निधी हवा असेल तर माझ्याच बायकोला मते द्या. मी वाढपी आहे. कुणाला किती वाढायचे ते माझ्या हातात आहे, म्हणून सगळ्यांनी वाढप्याच्या पक्षात यावे.’’ अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून या धमक्या देत असतील तर निवडणूक आयोगाने त्यांच्या हकालपट्टीच्या सूचना द्यायला हव्यात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जाब विचारायला हवा, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

अजित पवार हे मतदारांना उघड उघड धमक्या देऊ लागले आहेत. बायकोला मते दिली नाहीत तर, इंदापूरला पाणी मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिली आहे. बारामतीतील उद्योजक, लहान व्यापारी यांना अजित पवार यांनी धमकावले की, ‘‘जास्त उड्या माराल तर याद राखा. नाक दाबून तोंड कसे उघडायचे ते आपल्याला चांगले समजते,’’ याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग भाजपाची धुणीभांडी करतोय काय? ठाकरे गटाचा बोचरा सवाल


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 30, 2024 12:59 PM
Exit mobile version