रेमडिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, एफडीए कडून रॅकेट उध्वस्त!

रेमडिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, एफडीए कडून रॅकेट उध्वस्त!

फोटो सौजन्य - दीपक साळवी

कोविड १९ या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांमध्ये परीणामकारक ठरलेल्या रेमडिसिविर इंजेक्शनची उपलब्धता व मागणी यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास मिळाल्या होत्या. अन्न व औषध प्रशासनाचा दक्षता विभाग सदर काळाबाजार करणारे यांच्या मागावर होता. सदर प्रकारात गुंतलेल्या एका व्यक्तिचा मोबाइल क्रमांक  सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांना प्राप्त झाला होता. रेमडिसिविरचा काळाबाजार करून अवैधपणे विक्री करणारी मोठी टोळी मुंबई व आसपासच्या परिसरात सक्रिय असल्याच्या शक्यतेवरून सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांच्या नियंत्रणा खाली गोपनीय कारवाई रचण्यात आली. सदर मोबाईल क्रमांकावर  औषधांची मागणी केली असता या औषधाची प्रत्येक व्हायल किंमत रुपये तीस हजार अशा दराने विक्री करण्याचे मान्य केले. या औषधाची छापील किंमत पाच हजार चारशे असे असते वेळी त्यांनी ३०हजार किंमत असल्याचे आढळले.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दिनांक १८ जुलै २०२० रोजी बाल राजेश्वर मंदिर, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम येथे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला व विकास दुबे व राहुल गाडा हे एक रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विक्री कण्यासाठी आले असता त्यांना या औषधाची विक्री करतांना रंगेहात पकडले. पुढील तपासात COVIFOR या औषधाच्या व्हायरलचा साठा राहुल गाडा यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या औषधाच्या काळाबाजार करून विक्रीच्या साखळी मध्ये भावेश शहा, अशिष कनोजिया, रितेश ठोंबरे,  गुरविंदर सिंग व सुधीर पुजारी (डेलफा फार्मासिटिकल, घाटकोपर, मुंबई) हे सामील असल्याचे आढळले.

या सर्व व्यक्तिंकडे चौकशी करून दोन ठिकाणाहून १२ व सापळ्या दरम्यान १ अश्या एकूण १३ रेमडिसिविर इंजेक्शनचा अवैधपणे बाळगलेला साठा जप्त करण्यात आला. या सर्व व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्व व्यक्ती औषधे दुकानदाराकडे सेल्समन अथवा औषधी कंपनीचे विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्याचे आढळून आले. सदर औषध विक्री करते रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णांचे ओळखपत्र याची मागणी विक्री करते वेळी केली नाही.

प्रकरणाचे गांभिर्य व व्याप्ती बघता गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक सात घाटकोपर पोलीस यांचे सहाय्य घेण्यात आले. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक सात घाटकोपर पोलीस यांच्यासमवेत अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी केली. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यांमध्ये श्री नांदेकर औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता,  औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे १९४० व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे.

सदरची कारवाई माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषध प्रशासन,  राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन यांनी अशा औषधांचा काळाबाजार व वाजवी किमतीत विक्रीवर यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाच्या अनुषंगाने अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन,  सुनील भारद्वाज सहआयुक्त दक्षता,  गहाणेसह आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासनाच्या दक्षता विभाग, बृहन्मुंबई विभाग व गुन्हा शाखा घाटकोपर युनिट क्रमांक ७ यांनी संयुक्तपणे केली.


हे ही वाचा – Video : रमचा पेग मारा, अंडी खा कोरोनाला पळवा- काँग्रेस नेत्याचा अजब सल्ला!


First Published on: July 19, 2020 1:30 PM
Exit mobile version