‘एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने, मुंबईच काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच’

‘एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने, मुंबईच काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच’

मुंबईच काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा

‘दोन दिवस पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढले आहे. तर मुंबईत बुधवारी चार तासात ३०० मिमी विक्रमी पाऊस पडला आहे. गेल्या ३० वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईचे काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच’, असा दावा मुंबई महापालिकेचे पालिका आयुक्त आय.एस.चहल यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहे की, मुंबईतील काही भागांत काल एकप्रकारचे वादळत आले होते.

दक्षिण मुंबईत पावसाचा अधिक प्रभाव

मुंबईत काल (बुधवारी) ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचे वादळच होते. पण, संपूर्ण मुंबईत हे वादळ नव्हते. दक्षिण मुंबईतच त्याचा प्रभाव होता. वादळ दोन प्रकारचे असतात कालचे वादळ हे त्यापैकी एक होते, असे चहल म्हणाले. काल कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसरात विक्रमी पाऊस झाला. मुंबईत चार तासांत ३०० मिमी पाऊस पडला. मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे. पण, असा पाऊस कधीच पाहिला नाही. २६ जुलैलाही मी मुंबईत होतो. पण, त्यावेळीही असा पाऊस कधीच पाहिला नव्हता, असे देखील ते पुढे म्हणाले.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक‌ म्हणजे ३०९ मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या ‘डी’ विभाग परिसरात नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सर्वाधिक वेग नोंदविण्यात आला आहे. मरीन लाईन्स परिसरात दरताशी तब्बल १०१.४ किलोमीटर एवढा वाऱ्यांचा कमाल वेग सायंकाळी ४:१५ च्या सुमारास नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार – कर्मचारी – अधिकारी अव्याहतपणे कार्यरत होते.


हेही वाचा – मुंबईत गेल्या १२ तासात सर्वाधिक पावसाची नोंद; पालिकेच्या ‘डी’ विभागात सर्वात जास्त पाऊस


 

First Published on: August 6, 2020 12:31 PM
Exit mobile version