‘करोना’मुळे नगरसेवकांची चायना संधी हुकणार; अभ्यास दौरा रद्द करण्याची शक्यता

‘करोना’मुळे नगरसेवकांची चायना संधी हुकणार; अभ्यास दौरा रद्द करण्याची शक्यता

‘करोना’व्हायरस

मुंबई महापालिकेतील सर्व विशेष समिती तसेच सुधार समितीचे अभ्यास दौरे येत्या काही दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले असून आरोग्य समिती सदस्यांसह महापौर, सभागृहनेते तसेच इतर नगरसेवक आणि अधिकारीही चायनाच्या अभ्यास दौर्‍याला पुढील महिन्यात जाणार आहे. मात्र, चीनमध्ये ‘करोना’ संसर्गजन्य आजारांची लागण झाल्याने त्याचे लोण आता भारतात तथा मुंबईतही पसरु लागले आहेत. त्यामुळे महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचा हा चीनचा दौरा रद्द केला जाण्याची शक्यता आहे.
वृक्ष प्राधिकरणाचा सदस्यांचा अभ्यास दौरा  सिंगापुरला तर आरोग्य समिती सदस्यांसाठी चायना येथे आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय सुधार समितीचा दौरा बंगरुळू उटी म्हैसूर,  शिक्षण समितीचा देहरादून आणि महिला आणि बाल कल्याण समितीचा दौरा केरळ आणि स्थापत्य शहर समितीचा दौरा अंदमान निकोबारला आयोजित करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य समिती ही विशेष समिती असल्याने त्यांना देशाच्या बाहेर अभ्यास दौरा केल्यास त्याचा खर्च महापालिकेला करता येत नाही. त्यामुळे आरोग्य समिती अध्यक्ष आणि सदस्यांसह महापौर, सभागृहनेते तसेच नगरसेवकांचा चायना दौरा जवळपास निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये नगरसेवक स्व:खर्चाने चायनाला जाणार आहेत. यासाठी प्रत्येकी ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च आहे. यासाठी आतापर्यंत काही अध्यक्षांसह तब्बल सात ते आठ नगरसेवकांनी आपले पैसे आरोग्य समिती अध्यक्षांकडे जमा केले असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्यासह विविध विशेष समित्यांचे अध्यक्ष आणि नगरसेवकांचा हा चायना दौरा निश्चित झालेला असून पुढील महिन्यात ते सर्व चायनाला उड्डाण करण्याच्या तयारीत आहे.

चायनामध्ये ‘करोना’ संसर्गजन्य आला

परंतु, अचानक चायनामध्ये ‘करोना’ हा संसर्गजन्य आजार पसरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत चीनमध्ये या संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ लोकांना याची लागण झाली आहे. तर चीनमधून भारतात आलेल्या तीन संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराची गंभीरता लक्षात घेता, त्याठिकाणी सध्या काही महिने जाणे धोक्याचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांचा हा प्रस्तावित चायना दौरा रद्द करण्याची नामुष्की आली आहे. हा दौरा स्व:खर्चाने असला तरी आरोग्याचा विचार करता तुर्तास चायनाचा हा दौरा रद्द करण्याचा विचार असल्याचे नगरसेवकांकडून समजते.
First Published on: January 26, 2020 3:01 PM
Exit mobile version