पंचतारांकित हॉटेलमधील ६०० खोल्या कोरोना रुग्णांसाठी घेणार, महापालिकेचा निर्णय

पंचतारांकित हॉटेलमधील ६०० खोल्या कोरोना रुग्णांसाठी घेणार, महापालिकेचा निर्णय

वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना रुग्णाला वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर जे रुग्ण १० दिवसांनंतरही कोरोना बाधित आढळतात त्या रुग्णांवर लक्ष ठेवत उपचार करण्यासाठी तारांकित हॉटेलमधील ६०० खोल्या पालिकेने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या पुन्हा कोरोना चाचण्या करण्यात येतात. मात्र १० दिवसांनंतरही ज्या रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली पण लक्षणे कमी झाली आहेत, अशा रुग्णांवर त्याच खासगी रुग्णालयात पुढील उपचार न करता त्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेल्समध्ये केली जाणार आहे. त्यासाठी ६०० बेडची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांमध्ये रिक्त होणार्‍या ६०० खाटा नवीन कोरोना रुग्णांसाठी वापरता येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत वाढत जाणारी कोरोना बाधित रुग्ण संख्या, रुग्णालयात खाटांची क्षमता, कोरोना अहवाल मिळण्यास उशीर होणे, रुग्णांना वेळीच उपचार मिळणे याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी झूमद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील चार पंचतारांकित हॉटेलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याचे एकमत झाले आहे. टास्क फोर्सचे सदस्य व कोरोना संबंधित खाटाचे समन्वयक डॉ. गौतम भंसली यांनी याला दुजोरा दिला आहे. हॉटेलमधील खोल्यांमध्ये जे रुग्ण १० दिवसांहून अधिक दिवस रुग्णालयात दाखल आहेत, तसेच उपचारानंतरही अशा रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येतो, अशा रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या रुग्णांना रुग्णालयाच्या दरानुसार पैसे भरावे लागणार आहेत.


हेही वाचा – पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी पूर्वतयारीचे आदेश
First Published on: April 12, 2021 10:47 PM
Exit mobile version