अरेरे! महापालिकेच्या आयटी विभागाला संचालकच मिळेना

अरेरे! महापालिकेच्या आयटी विभागाला संचालकच मिळेना

मुंबई महापालिका

सुमारे तीस हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) विभागाला कायमस्वरुपी संचालक मिळेनास झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालकपद कंत्राटीपध्दतीने बाहेरुन भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापलिकेने जाहिरात दिली आहे. परंतु मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना, बाहेरच्या व्यक्तीला आयटी विभागाचे प्रमुख म्हणून नेमण्याची पुन्हा वेळ आली. बाहेरच्या व्यक्तीच्या हातात महापालिकेच्या आयटी विभागाची पुन्हा दोरी जाणार असून या पदावर कायमस्वरुपी अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेत एकही लायक अधिकारी नसल्याचे दाखवून दिले आहे.

सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याकडे तात्पुरता भार

मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान (आय टी) विभागाच्या संचालकपदासाठी जाहिरात देण्यात आली असून खासगी क्षेत्रातील अनुभवानुसार हे पद भरले जाणार आहे. तत्कालीन सहआयुक्त डॉ. सतीश भिडे आणि अतिरिक्त श्रीकांत सिंह आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी यापूर्वी आयटी विभागाचा भार समर्थपणे उचलला होता. मात्र, त्यानंतर या विभागाचा कारभार विस्कळीतच चालला आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या योगेश महांगडे, विजय बालमवार, महेश नार्वेकर यांच्यावर अधूनमधून प्रभारी भार सोपवल्यानंतर २०१४ मध्ये हे पद बाहेरुन कंत्राटी स्वरुपात भरले होते. त्यावेळी हिमेश व्होरा यांची या पदावर निवड करण्यात आली. परंतु व्होरा यांनी दीड वर्षांत महापालिकेच्या कारभाराला कंटाळून आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे महापालिकेने पुन्हा अंतर्गत परीक्षा घेवून हे पद भरण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अरुण जोगळेकर यांची निवड झाली. परंतु त्यांच्याकडे कायमस्वरुपी भार देण्याऐवजी ते आधी सांभाळत असलेल्या विभागासह या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्यामुळे दोन्ही पदांचा भार पेलणे शक्य नसल्याने जोगेळेकर यांनी या पदावर काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त झाले आणि आता एच/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याकडे या विभागाचा तात्पुरता भार सोपवला.

आयटीत आता १२५ पदे

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रविणसिंह परदेशी यांनी आयटी विभाग सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयटी संचालक यापदासह मॅनेजर आणि इतर पदे वाढवण्याचे आदेश बजावले आहेत. त्यानुसार खासगी क्षेत्रातून हे पद भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. सध्या या विभागात संचालक, उपसंचालकांसह एकूण ४८ पदे असून ही पदेही वाढवून १२५ एवढी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. त्यामध्ये प्रत्येक विभाग आणि खात्यांचे प्रमुख यांना प्रत्येकी एक माहिती तंत्रज्ञान सहायक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संचालकांचे पद भरताना अतिरिक्त पदे वाढवण्याचा आणि रिक्त पदे भरण्याचा विचार आयटी विभागाच्या माध्यमातून सुरु आहे.

प्रशासनाचा आयटी विभागाकडे कानाडोळा

मात्र, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणार्‍या महापालिकेकडून अद्यापही या पदासाठी कायमस्वरुपी अधिकारी नेमता आलेले आहे. काही वर्षांपूर्वी झालेला ई निविदेतील घोटाळा असो वा निविदा प्रक्रीयेसंदर्भात आय टी विभागाबाबत केले जाणारे आरोप असो. यासर्व बाबी वगळता महापालिकेतीलच आयटी विभागाची माहिती असणार्‍या अधिकार्‍याकडे कायमस्वरुपी जबाबदारी सोपवणे आवश्यक असताना प्रशासन या महत्वाच्या विभागाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेकडे या पदासाठी लायक अधिकारी नाही म्हणून हे पद कायमस्वरुपी भरत नाही की या विभागाला प्रशासन गंभीरतेने घेत नाही, म्हणून दुर्लक्ष करते,असा सवाल उपस्थित होत आहे.

First Published on: July 31, 2019 10:40 PM
Exit mobile version