शेल्टरहोम्समधील मुलांच्या मदतीसाठी धावली महापालिका

शेल्टरहोम्समधील मुलांच्या मदतीसाठी धावली महापालिका

मुंबई महानगरपालिका

संपूर्ण मुंबई करोनाच्या भीतीखाली असून सर्वच दुकाने, हॉटेल्स आणि अन्य प्रकारची कार्यालये बंद झाली आहेत. त्याचा परिणाम शेल्टर होममध्ये राहणाऱ्या मुलांवर होत आहे. त्यामुळे या सर्व बेघर मुलांची काळजी विविध संस्थांच्या माध्यमातून उचलली जात असली तरी मुंबई महापालिकेने आता यासर्व मुलांना जेवण पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने सर्व शेल्टरहोममधील मुलांना जेवण तसेच नाश्ता उपलब्ध करून दिले जात आहे.

मुलांना केले मास्क,सॅनिटायझरसह जेवणाचे वाटप

मुंबईमध्ये सध्या बेघर मुलांची राहण्याची व्यवस्था असणारे १३ शेल्टर होम्स आहेत. या शेल्टर होम्स विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालवली जात आहेत. परंतु, संपूर्ण मुंबईसह राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर, या मुलांच्या जेवण-नाश्त्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या नियोजन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेल्टर होमधील मुलांना मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था या विभागाच्यावतीने केली जात आहे. याबरोबरच रस्त्यावरील काही गरीब कुटुंबांनाही अशाप्रकारच्या जेवणाचा पुरवठा केला जात आहे.

अन्नदानासाठी अनेक हात पुढे

करोनामुळे रस्त्यावरील अनेक गरीब कुटुंबांवर तसेच भिकाऱ्यांवर आलेल्या संकटामुळे त्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक दाते पुढे येवू लागले आहेत. भायखळा विधानसभा मतदार संघात आमदार यामिनी जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विभागातील गरीब आणि रस्त्यांवरील भिकारी लोकांसाठी खास अन्नवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. दरदिवशी शेकडो जेवणाची पाकिटे तयार करून रस्त्यांवरील गरीब कुटुंबांपासून ते भिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच याचे वाटप करण्यात येत आहे. करोनाचे सावट दूर होईपर्यंत या अन्नदानाचे वाटप सुरुच राहिल,असेही त्यांनी सांगितले. तर जोगेश्वरीतील भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांनी खास पोलिसांसाठी पाणी आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

शेल्टर होम आणि त्यातील मुलांची क्षमता

First Published on: March 26, 2020 9:15 PM
Exit mobile version