केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ मुंबई’ची महापौरांनी केली पोलखोल!

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ मुंबई’ची महापौरांनी केली पोलखोल!

प्रातिनिधिक फोटो

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या सर्वेक्षणांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले असले तरी ही नगरी स्वच्छ नाही, हे उघड सत्य मुंबईच्या महापौरांनीच खुलेआम मान्य केले आहे. महापौरांची ही कबुली केंद्राच्या स्वच्छनगरी स्पर्धेच्या निकालालाच छेद देणारी आहे. यामुळे स्पर्धेचा मूळ हेतूच संशयाच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबईचा स्वच्छ शहर म्हणून गौरव होताना नेमकी परिस्थिती वेगळी असल्याचे पत्रकारांनी महापौरांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी मुंबई १०० टक्के स्वच्छ नसल्याची कबुली दिली.

केंद्र सरकारने देशभरातील राजधान्यांमधून स्वच्छ शहर म्हणून मुंबईचा गौरव केला आहे. स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांनी केलेल्या सहकार्याकरिता आयुक्तांनी मुंबईकरांचे आभार मानत महापालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. आयुक्तांनी कौतुक केल्यानंतर महापौरांनीही पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांचे, अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र यावेळी पत्रकारांनी कालच पाहणी करताना नाले सफाईसह शहरात असलेल्या घाणीकडे लक्ष वेधले. शहरातील तुंबलेली गटारे, जागोजाग दिसणारा कचऱ्याची माहिती पत्रकारांनी दिली तेव्हा शहर स्वच्छ नाही, हे महापौरांनाच कबूल करावे लागले. शहरात १०० टक्के स्वच्छता नसताना शहराचा स्वच्छ शहर म्हणून गौरव कसा झाला असा प्रश्न उपस्थित केल्यावर मुंबई १०० टक्के कधीच स्वच्छ नसते, असे सोयीचे उत्तर महापौरांनी दिले. कचरा वर्गीकरणाबाबत मुंबईकर सजग झाला आहे. झोपडपट्टी विभागात मात्र स्वच्छता नसल्याचे चित्र असले तरी त्यावर आम्ही मात करू असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

जबाबदारी झटकत नाही

मुंबईतील नालेसफाई झालीच नाही असे नाही. नालेसफाईचे काम धीम्यागतीने सुरु आहे. वेगाने काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मुंबईत मेट्रोच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी पालिकेच्या मलनि:सारण व पर्जन्य जलवाहिन्यांची तोडफोड केल्याने मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. हा आरोप नसून वस्तुस्थिती सांगितली असा खुलासा महापौरांनी केला.

First Published on: May 18, 2018 9:33 AM
Exit mobile version