Corona Vaccination: BMCला लस देण्यासाठी ८ पुरवठादारांकडून प्रतिसाद

Corona Vaccination: BMCला लस देण्यासाठी ८ पुरवठादारांकडून प्रतिसाद

'विशेष प्रकल्प निधी' उभारण्यास काँग्रेस, भाजपचा विरोध ; सेना एकाकी पडणार

मुंबईकरांना लसीचे डोस देण्यासाठी मुंबई महापालिकेने काढलेल्या ‘ग्लोबल टेंडर’ला गेल्या २४ तासात चांगला प्रतिसाद लाभल्याने आता १ कोटी लसीच्या मात्रांचा पुरवठा करण्यास एकूण ८ पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे. या ८ पैकी ६ पुरवठादार रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस देण्यास तयार आहेत. तर एका पुरवठादाराने ‘स्पुटनिक लाईट’ ह्या लसीचा आणि उर्वरित एका पुरवठादाराने ‘एस्ट्राझेनेका’ आणि ‘फायझर’ लस यांचा पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. मात्र पालिकेने या सर्व पुरवठादारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १ जून पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत आणखीन कोणीही नवीन पुरवठादार टेंडर प्रक्रियेत सहभाग घेऊ शकणार आहे. मात्र त्याला १ जूनपर्यंतच सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

२४ मे पर्यंत मुंबई महापालिकेला लस पुरवठा करण्यासाठी फक्त ४ पुरवठादारांनी तयारी दर्शवली होती. परंतु त्यांनी कागदपत्रे सादर केली नव्हती. मात्र गेल्या २४ तासांत आणखीन ४ पुरवठादारांनीही लसीचा पुरवठा करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता पालिकेने सर्व इच्छुक पुरवठादारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता १ जूनपर्यंत करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परिणामी लस पुरवठादारांमध्ये काही प्रमाणात स्पर्धा घडून येण्याची आणि लसीच्या दरात फरक पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने १२ मे रोजी ग्लोबल टेंडर काढले होते. त्यानंतर १८ मे पर्यंत ४ पुरवठादारांनी प्रतिसाद देत तयारी दर्शवली. मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न झाल्याने पालिकेने स्वारस्य अभिव्यक्तीला मुदतवाढ २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या २४ तासांत आणखी ४ पुरवठादारांनी प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यांच्यादेखील कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी आहे.

लस पुरवठा वेळेत होण्यासाठी पालिका खातरजमा करणार

लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादित करीत असलेल्या कंपन्या या दोघांमधील व्यावसायिक संबंधांची पडताळणी पालिकेतर्फे तपासण्यात येणार आहे. कारण की, जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होऊ शकणार आहे. तसेच, पुरवठादार नेमक्या किती दिवसात लस पुरवठा करणार, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर आणि रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महापालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

First Published on: May 25, 2021 7:43 PM
Exit mobile version