‘जी – २०’ शिष्टमंडळाने केले पालिकेच्या आपदा मित्र, सखींचे विशेष कौतुक

‘जी – २०’ शिष्टमंडळाने केले पालिकेच्या आपदा मित्र, सखींचे विशेष कौतुक

संग्रहित छायाचित्र

 

मुंबई: मुंबईत २३ ते २५ मे या कालावधीत पार पडलेल्या ‘जी-२०’ गटाच्या तीन दिवसीय बैठकीदरम्यान मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे प्रशिक्षित ३५ ‘आपदा सखी’ व २३ ‘आपदा मित्र’ अशा ५८ स्वयंसेवकांनी अतिशय उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्य केल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिनिधींसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर, ‘जी-२०’ कार्य गटाच्या संचालिका मृणालिनी श्रीवास्तव यांनी काढले.

यावेळी बैठकीत सहभागी देश विदेशातील सर्वच प्रतिनिधींनीही मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने यशस्वीपणे राबविलेल्या ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ या संकल्पनेचे विशेष कौतुक केले.
‘जी-२०’ गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळालेला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर ‘जी-२०’ देशांच्या कार्य गटांच्या बैठका होत आहेत. त्यातील ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत २३ मे ते २५ मे यादरम्यान वांद्रे- कुर्ला संकुल परिसरातील ‘जिओ कन्व्हेन्शन सेंटर’ येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी ‘जी २०’ सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र संघाचे आणि भारत सरकारचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मुंबईत वास्तव्यास असताना या सर्व मान्यवर प्रतिनिधींची व्यवस्था अधिकाधिक चांगली व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे प्रशिक्षण देण्यात आलेल्या ५८ ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली होती‌. निवड झालेल्या सर्व ५८ स्वयंसेवकांना टप्पेनिहाय पद्धतीने विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे, अशी माहिती याबाबत अधिक माहिती देताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी यावेळी दिली.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांनी माहिती देताना सांगितले की, सर्व स्वयंसेवकांना ‘समन्वय अधिकारी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. देश विदेशातून आलेल्या प्रतिनिधींच्या आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत हे स्वयंसेवक प्रतिनिधींच्या सहकार्यासाठी उपस्थित होते. पाहुण्यांना मुंबई बद्दल माहिती देणे, विविध ठिकाणी त्यांना वेळेत घेऊन जाणे इत्यादी विविध कार्य या स्वयंसेवकांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली.

First Published on: May 25, 2023 10:52 PM
Exit mobile version