मुंबईत आता मांजरांचीही होणार नसबंदी!

मुंबईत आता मांजरांचीही होणार नसबंदी!

ओशिवरा येथे मांजरीला जिवंत जाळलं

भटक्या कुत्र्यांप्रमाणे आता मांजरांचीही नसबंदी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या देवनार पशुवधगृह विभागाने अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाशी पत्रव्यवहार केला आहे. प्राणी प्रजनन नियंत्रण प्रकल्पांतर्गत मांजरांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

नसबंदी प्रस्तावाला मंजुरी

प्राणीविषयक कायद्यात भटक्या मांजरांबद्दल कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांप्रमाणे मांजरांचीही नसबंदी करणे आवश्यक असून आता मांजरांची देखील नसबंदी करण्यात यावी याविषयीचा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी सभागृहात मांडला होता. तसेच भटक्या कुत्र्यांप्रमाणे त्यांना देखील रेबीज प्रतिबंधक लसही देण्यात यावी. हा ठराव फेब्रुवारी २०१८ मध्ये पालिका सभागृहात एकमताने मंजूर देखील करण्यात आला आहे.

मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली करणे आवश्यक

देवनार पशुवधगृह खात्याने भटक्या मांजरांची नसबंदी करायची असल्यास त्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली तयार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्याशी पत्रव्यवहार करून भटक्या कुत्र्यांप्रमाणे मांजरांचा देखील समावेश करण्याबाबत आणि मार्गदर्शक तत्त्वे कळविण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्याशी पत्रव्यवहार केला असून नियमावली अस्तित्वात आल्यानंतर मुंबई माहापालिका मांजरांच्या नसबंदीबाबत सकारात्मक पावले उचलणार आहे.  – देवनार पशुवधगृह विभाग

First Published on: August 2, 2018 10:45 AM
Exit mobile version