मुंबई महापालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई महापालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या चार उपायुक्तांसह सहा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. तसेच चार कार्यकारी अभियंत्यांना सहाय्यक आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांबाबत पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उपायुक्तांच्या बदल्या

परिमंडळ-२ चे उपायुक्त विजय बालमवार यांची परिमंडळ-१ मध्ये बदली करण्यात आली आहे. तर परिमंडळ-१ चे उपायुक्त हर्षल काळे यांची परिमंडळ-२ मध्ये बदली झाली आहे. तसेच परिमंडळ-७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांची परिमंडळ-५ मध्ये बदली करण्यात आली आहे. परिमंडळ-५ चे उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांची परिमंडळ-७ च्या उपायुक्तपदी बदली करण्यात आलेली आहे.

सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

पालिकेच्या ‘टी’ वार्डाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची सहाय्यक आयुक्त अतिक्रमण पूर्व उपनगरेपदी (पश्चिम उपनगरेचा अतिरिक्त कार्यभार), एम/ पश्चिम वार्डाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांची के/ पश्चिम वार्डाच्या सहाय्यक आयुक्तपदी, आर / उत्तर वार्डाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांची आर/दक्षिण सहाय्यक आयुक्तपदी, बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची आर/ उत्तर सहाय्यक आयुक्तपदी, के/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांची करनिर्धारक व संकलक विभागात, ‘एल’ वार्डाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांची ‘ई’ वार्डाच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी

पालिकेच्या बाजार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ यांच्यावर सहाय्यक आयुक्त (बाजार) पदाची जबाबदारी, ‘टी’ विभागाचे कार्यकारी अभियंता राजन प्रभू यांच्यावर ‘टी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची, ‘एम/ पश्चिम’मधील कार्यकारी अभियंता सुरेश सागर यांच्यावर एम/ पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची, तर ‘एल’ वार्डाचे कार्यकारी अभियंता हरिनाम साहू यांच्यावर ‘एल’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

First Published on: July 20, 2021 11:02 PM
Exit mobile version