BMC Update : मुंबईत आतापर्यंत 47.60 टक्के नालेसफाई

BMC Update : मुंबईत आतापर्यंत 47.60 टक्के नालेसफाई

मुंबई : मुंबईपासून काही तासांच्या अंतरावरील पुणे, ठाणे जिल्ह्यात (शहापूर) या ठिकाणी याच आठवड्याच्या प्रारंभी अवकाळी जोरदार पाऊस पडल्याने मुंबई महापालिका नालेसफाई कामांना गतिमान करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे ४७.६० टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. ३१ मेपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत नाल्‍यातील गाळ काढण्‍याची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. (BMC Update 47.60 percent drain cleaning in Mumbai)

मुंबईत दरवर्षी जुना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अथवा दुसऱ्या आठवड्यात तरी पाऊस पडतो. वातावरणात काही बदल झाल्यास पाऊस आणखीन काहीसा लांबतो. मात्र २६ जुलै २००५ रोजी मुंबईत निर्माण झालेली पूरस्थिती व त्यामुळे झालेले मोठे नुकसान पाहता मुंबई महापालिका तेव्हापासून अलर्ट झाली आहे. नालेसफाईच्या कामांवर आणि मिठी नदी सफाई कामांवर जास्तीत जास्त भर दिला जात आहे.

पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसानंतर अशी तीन टप्प्यात मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे येथील नद्या, लहान – मोठे नाले, हायवे लगतचे नाले आदींची साफसफाई करण्यात येते. या नेलसफाई कामाच्या अंतर्गत रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांचीसुद्धा सफाई करण्यात येते.

हेही वाचा – School Time : सकाळी 9 वाजताची शाळा नको; शासन निर्णयाला पालकांचा विरोध

यंदा पावसाळ्यापूर्वी १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी, आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ४७.६० टक्के गाळ २० एप्रिलपर्यंत काढण्‍यात आला आहे. आता उर्वरित ५२.४० टक्के गाळ ३१ मेपर्यंत काढण्यात येणार आहे.

आतापर्यंत काढण्यात आलेल्या गाळाबाबतचा सविस्तर माहिती :

१) शहर विभागातील विविध नाल्‍यांमधून ३० हजार ९४० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी आतापर्यंत १० हजार ४४० मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण ३३.७४ टक्‍के आहे.

२) पूर्व उपनगरातील विविध नाल्‍यातून १ लाख २३ हजार ५५३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत ५९ हजार ३४४ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४८.०३ टक्‍के आहे.

३) पश्चिम उपनगरातील विविध नाल्‍यातून २ लाख ३५ हजार ०२१ मेट्रिक टन गाळ काढला जाणार आहे. पैकी आतापर्यंत ९९ हजार ८०२ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४२.४७ टक्‍के आहे.

४) मिठी नदीतून २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी, आतापर्यंत १ लाख ४५ हजार ८०८ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ६७.४५ टक्‍के आहे.

५) मुंबईतील सर्व लहान नाले मिळून ३ लाख ६३ हजार ५३३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत १ लाख ४९ हजार २३० मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४१.०५ टक्‍के आहे.

६) महामार्गांलगतच्‍या नाल्‍यांमधून एकूण ५२ हजार ५६० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी आतापर्यंत २१ हजार ७५२ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४१.३९ टक्‍के आहे.

गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे. प्रत्येक कामासाठी दृकश्राव्य चित्रफित (व्हिडिओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नालेसफाई कामात पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न

नालेसफाईचे काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिनही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. असे छायाचित्रण व चित्रफित तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून करुन घेण्यात येत आहे.


हेही वाचा – Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा पाळा अन्यथा भरा भुर्दंड

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 21, 2024 9:03 PM
Exit mobile version