LockDown: कुंटणखान्यातील ‘ती’च्या हातांनाही महापालिका देणार बळकटी

LockDown: कुंटणखान्यातील ‘ती’च्या हातांनाही महापालिका देणार बळकटी

‘ती’च्या त्या चार भिंतीत शरिराची भूक शमवायला लाखो जण जायचे. पण आता कोरोनाच्या काळात त्यांनीच पाठ   फिरवली. त्यामुळे तिचे जगणेही आता कठिण होवून बसले आहे. सध्या तिच्या पोटाच्या भुकेला एक घास द्यायलाही जिथे लोकांना लाज वाटते, तिथे महापालिका तिच्या पोटा-पाण्याचा प्रश्न कायमच सोडवत त्यांचे हातच अधिक बळकट करण्याचा विचार करत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देह विक्रीचा व्यवसाय करता येत नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या महिलांचा बचत गट बनवून त्यांच्यामार्फत सॅनिटरी नॅपकीन तसेच प्लेट बनवण्याचे प्रशिक्षण देत त्यांच्या हाताला काम देण्याचा विचार महापालिकेचा आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या का होईन देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिला आत्मनिर्भर बनलेल्या दिसणार आहेत.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यानंतर सर्व व्यवहारच थांबले गेले आहेत. त्याचाच फटका हातावर पोट असलेल्या देह विक्री करणाऱ्या महिलांना बसला आहे. मुंबईत अशाप्रकारचे कुंटणखाने असून तेथील महिलांवर आता गिऱ्हाईकांनीच पाठ फिरवल्याने उपासमारीची वेळ आली आहे. भांडुपच्या सोनापुरमधील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या या हालअपेष्टांचा दखल घेत याठिकाणी देवामृत फाऊंडेशन व गोयल ट्रस्टच्या माध्यमातून जिवनावश्यक वस्तू तसेच इतर प्रकारच्या वस्तूंचे वाटप केले जात आहे. इतर स्वयंसेवी संस्थांची मदत येथील महिलांना मिळत असली तरी मुंबई महापालिकेचेही याठिकाणी विशेष लक्ष आहे. महापालिका नियोजन विभागाच्यावतीन येथील महिलांचीही काळजी घेतली जात असून समाज विकास अधिकारी वेदिका पाटील यांनी पुढाकार घेत येथील महिलांना सॅनिटरी नॅपकीन तसेच जिवनावश्यक वस्तूंचेही वाटप केले.

आजवर चार भिंतीच्या आतच काळोख्या जीवन जगणाऱ्या या महिलांना बाहेरील व्यक्तींचा तसा परिचय नाही. परंतु मागील अडीच ते तीन महिन्यांपासून ज्या पोटाची भूक शमवण्याची देह विक्री केली जाते, तिथे सर्वांनी पाठ फिरवल्याने मोठा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु महापालिकेच्यावतीने जिवनावश्यक किटसह सॅनिटरी नॅपकीन आदींची भेट हाती पडल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रु खूप काही सांगून जात होत्या. येथील १५० ते २०० महिलांना ही भेट देण्यात आली आहे. यापूर्वी नियोजन विभागाच्या प्रमुख अधिकारी डॉ. संगीता हसनाळे यांनी या महिलांना कपडे उपलब्ध करून दिले होते. मात्र, अशाप्रकारच्या महिलांसाठी काही स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तिथे कार्य करणे सोपे जात आहे. त्यामुळे या महिलांची उपासमार थांबवण्यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. त्यामुळे या सर्व महिलांचा बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून त्यांना सॅनिटरी नॅपकीन किंवा प्लेट बनवण्याचे प्रशिक्षण देत त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत सुरु आहे.

सोनापूरच्या कुंटणखान्यातील अनेक महिला गावी निघून गेल्या आहेत. तर काही महिला सध्या याचठिकाणी राहत आहे. त्यामुळे या महिलांना रोजगार उपलब्ध करून झाल्यास लॉकडाऊनच्या काळातील त्यांची उपासमार थांबवता येईल आणि खऱ्या अर्थाने येथील महिलांना आत्मनिर्भर बनवता येईल, असे अधिकाऱ्यांना वाटत आहे.

हेही वाचा –

धारावी नाही तर मुंबईतील ‘हे’ भाग कोरोनाचा ठरतायत हॉटस्पॉट!

First Published on: June 16, 2020 9:33 PM
Exit mobile version