बोरिवली – दहिसरकरांनी बेस्टच्या निर्णयाचे केले स्वागत

बोरिवली – दहिसरकरांनी बेस्टच्या निर्णयाचे केले स्वागत

बेस्ट भाडे

गेल्या काही दिवसांपासून बेस्ट भाडेकपातीची मुंबईकरांना प्रतिक्षा लागली होती. अखेर राज्य सरकारने सोमवारी बेस्ट भाडेकपातीला हिरवा झेंडा दाखवला आणि मंगळवारपासून बेस्टची ऐतिहासिक भाडेकपात लागू झाली. मंगळवारी हा भाडेकपातीचा पहिला दिवस होता. त्यामुळे ऐरवी बसची वाट पाहणार्‍या प्रवाशांच्या चेहर्‍यांवर आनंद दिसून येत आहे. बेस्टचा प्रवास फक्त पाच रूपये अशा घोषणा प्रवाशांच्या कानावर पडताच अनेक प्रवाशांनी बेस्टच्या बसकडे धाव घेतली. त्यामुळे बेस्ट बसगाड्या प्रवाशांनी भरुन जात असल्याचे चित्र दिसत आहे. या निर्णयामुळे मुंबईकर प्रवाशांवर खुश झाला असून मुंबईकरांनी बेस्ट प्रशासनाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. बोरिवली दहिसरमध्ये प्रवाशांनी पेढे वाटून बेस्टचे स्वागत केले आहे.

महापालिकाने ६०० कोटींची मदत करून बेस्टला दिली संजीवनी

आर्थिक गर्तेत सापडलेल्या बेस्टला मुंबई महापालिकाने ६०० कोटींची मदत करून बेस्टला संजीवनी दिली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकाने बेस्ट प्रशासनात काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. या अटी आणि शर्तीमध्ये बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला देण्यात आले. या दरकपातीमुळे प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच आहेत. तसेच बेस्टने सामान्य बसेस व्यतिरिक्त एसी बसेसच्या किमान भाड्यातही कपात केलेली आहे. एसी बसेसचे भाडे ६ रूपये करण्यात आले आहे. यापूर्वी एसी बसेससाठी १५ रूपयांचे किमान भाडे आकारण्यात येत होते. बेस्टच्या प्रवाशांनी बेस्ट आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर आणि शिवसैनिकांनी बोरिवली पश्चिम मधील आय. सी. कॉलनी तसेच दहिसर कांदरपाडा भागात फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. याप्रसंगी कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक २४५ मधील बेस्ट बसचालक, वाहक आणि प्रवाशांना गुलाबाचे फुल आणि पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. या निर्णयामुळे मुंबईमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – बेस्ट भाडे कपातीमुळे मुंबईकर खूश


 

First Published on: July 10, 2019 2:40 PM
Exit mobile version