शिक्षण विभागासाठी २,९४४ कोटींची तरतूद

शिक्षण विभागासाठी २,९४४ कोटींची तरतूद

महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार्‍या योजनांना गती देतानाच नवीन शैक्षणिक वर्षांपासून महापालिका शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याचा विचार करता घंटा वाजवून मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देणे, तसेच विशेष मुलांच्या शाळांमध्ये हात स्वच्छ धुता यावे म्हणून हँड सॅनिटायझर बसवणे आदींची नवीन घोषणा करण्यात आली आहे. याबरोबर शाळांमध्ये बाल अंतराळ वैज्ञानिक तयार करण्याच्या दृष्टीकोनातून डिजिटल दुर्बिण बसवून छोटी वेधशाळा स्थापन करण्याचा मानसही प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२०-२१चा अर्थसंकल्प सहआयुक्त आशुतोष सलिल यांनी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांना सादर केला. आगामी अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी २,९४४.५९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चालू अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी २,७३३.७७ कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यामुळे चालू अर्थसंकल्पाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठीच्या निधीत आयुक्तांनी कात्री न लावता तब्बल २०० कोटींनी निधी वाढवून दिला आहे.

शालेय इमारतींची दुरुस्ती, पुनर्रचना
महापालिकेच्या मालकीच्या स्वत:च्या ४३७ शालेय इमारती असून यापैकी काही शाळांची मोठी दुरुस्ती, पुनर्बांधणी तसेच नवीन कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व शालेय इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्रचनेच्या बांधकामांसाठी एकूण ३४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शाळा माहिती व्यवस्थापन यंत्रणा
शिक्षक व मुख्याध्यापक यांना शैक्षणिक कामातील काही वेळ अशैक्षणिक कामासाठी द्यावा लागतो. त्यासाठी शाळा स्तरावरील माहितीचे संकलन व अवलोकन करण्यासाठी एमआयएस यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शाळांचे मुल्यमापन
प्रथम टप्प्यात ३० शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता यांचे मुल्यमापन प्रक्रिया पूर्ण होवून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या मुल्यमापन अहवालानंतर प्रक्रियेनंतर महापालिका शाळांमधील चांगल्या बाबी समोर आल्या असून त्याप्रमाणे आवश्यक सुधारणा करण्यासाठी सुलभ झाले आहे. त्यामुळे आगामी वर्षात ९० शाळांमध्ये नाबेट संस्थेद्वारे शाळांचा दर्जा व गुणवत्ता यांचे मुल्यमापन करण्यात येणार आहे.

चेंजिंग मुव्हर, चेंजिंग माईंड
ब्रिटीश कौन्सिल, रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ डान्स व मेरीलेबोन क्रिकेट क्लब यांच्या सहाय्याने महापालिकेच्या शाळांमध्ये बदलत्या हालचाली, बदल मनाचे या उपक्रमाचे आयोजन प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या एकात्मिक कलागुणांना प्रोत्साहन देणे व त्याअनुषंगाणे लिंगभेदाची भावना कमी करून स्त्री-पुरुष समानता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे . या उपक्रमाद्वारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकत्रितरित्या नृत्य व क्रिडा खेळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. शारीरिक शिक्षणाच्या तासाला चेंजिंग मुव्हस, चेजिंग माईंड या उपक्रमाद्वारे लिंग समभावनेची जागृती करण्यात येत आहे़

टिंकरींग लॅब
इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या शालेय मुलांसाठी महापालिकेचे २५ माध्यमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर विचारशील प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. शालेय मुलांमध्ये सर्जनशीलता व जिज्ञासू वृती वाढीस लागून वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होवून नवीन व तांत्रिक वैज्ञानिक साहित्यांशी मुलांची ओळख होणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात २.२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

छोटी वेधशाळा
शालेय मुलांना अंतराळ विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी महापालिकेच्या विज्ञान कुतुहल भवन केंद्रांमध्ये डिजिटल दुर्बिण बसवून छोटी वेधशाळा स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सहआयुक्त आशुतोष सलिल यांनी केली. याठिकाणी शाळेतील शिक्षक व मुलांना डिजिटल दुर्बिणीवरील निरिक्षणे अनुभवायची याठिकाणी सोय करून देण्यात येणार आहे. याद्वारे आकाश निरिक्षणाचे प्रात्यक्षिक अनुभव सुनिश्चित करून निरिक्षणाद्वारे समालोचनात्मक विचार, संवाद आणि सहयोग या बाबी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये बाल अंतराळ वैज्ञानिक तयार होण्यास मदत होईल. एका वेळी २०० मुलांना याचा अनुभव घेता येणार आहे.

हँड सॅनिटायझर
शालेय मुलांनी हात स्वच्छ धुणे हे आजारांना आळा घालण्यासाठी नेहमीच फायदेशीर आहे. त्यामुळे शालेय मुलांना हात धुण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. यासाठी १७ आव्हानात्मक विशेष मुलांच्या शाळांमध्ये हँड सॅनिटायझर बसवण्यात येणार आहे. यासाठी १. ८४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

काही महत्त्ववाच्या योजनांसाठीची तरतूद

♦डिजिटल क्लासरुम : २९ कोटी रुपये
♦व्हर्च्युअल क्लासरुम : १२ कोटी रुपये
♦हाऊसकिपिंग : ७६ कोटी रुपये
♦पॉलिमर डेस्क व बेंच खरेदी : १.७५ कोटी रुपये
♦शालेय वस्तूंचा पुरवठा : १११.८२ कोटी रुपये
♦जलद इंटरनेटसह नवीन दूरध्वनी जोडणी : ४८ लाख रुपये
♦विद्यार्थिनींसाठी मुदत ठेव योजना : ७.८६ कोटी रुपये
♦शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास : १७ .६० कोटी रुपये
♦दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना : ८.०७ कोटी रुपये
♦मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय : १ कोटी रुपये
♦ई -लायब्ररी : १.५४ कोटी रुपये
♦सी.सी.टिव्ही कॅमेरा : २० कोटी रुपये

First Published on: February 5, 2020 4:29 AM
Exit mobile version